अभिनेत्रीच्या 8 लाखांच्या घड्याळाची चोरी; गुन्हा दाखल

file photo
file photo

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : गोरेगाव येथे राहणार्‍या अभिनेत्रीचे सुमारे आठ लाखांचे महागडे घड्याळ तिच्याच मोलकरणीने चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संगीता बर्मन या 26 वर्षांच्या मोलकरणीविरुद्ध गोरेगाव पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून तिचा शोध सुरु केला आहे. संगीता ही मध्यप्रदेशची रहिवाशी असून चोरीनंतर ती तिच्या गावी पळून गेल्याचा पोलिसांना संशय आहे.

32 वर्षांची तक्रारदार अभिनेत्री ही गोरेगाव परिसरात राहते. तिच्या वाढदिवसाला तिच्या एका मित्राने तिला आठ लाख रुपयांचे रोलेक्स कंपनीचे घड्याळ गिफ्ट दिले होते. ते घड्याळ ती ठराविक कार्यक्रमात घालते. फेब्रुवारी महिन्यांत तिने तिच्या घरी संगीता बर्मन या 26 वर्षांची तरुणी घरकामासाठी ठेवली होती. संगीताला एका खाजगी एजन्सीमार्फत तिच्याकडे पाठविण्यात आले होते. दिवसभर काम करुन ती तिच्यासोबत राहत होती.

27 फेब्रुवारीला तिची एक महत्त्वाची मिटींग होती, त्यामुळे तिने ते रोलेक्स घड्याळ घातले होते. त्यानंतर तिने घड्याळ तिच्या कपाटात ठेवले. 14 मार्चला संगीता ही तिच्या रुममध्ये गेली होती. अचानक तिला बघून ती प्रचंड घाबरली. काही वेळानंतर तिने तिला तिची आई आजारी असल्याने तिला तातडीने गावी जावे लागेल असे सांगितले होते. त्यामुळे तिने तिला गावी जाण्यास सांगितले. 9 एप्रिलला तिला एक इव्हेंटला जायचे होते. त्यामुळे तिने कपाटातून घड्याळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथे ते घड्याळ नव्हते. तिने सर्वत्र शोध घेतला, मात्र तिला कुठेच घड्याळ सापडले नाही.

संगीताने तिच्या रुमची सफाई करताना ते घड्याळ चोरी करुन आईच्या आजारपणाचा बहाणा करुन पलायन केले असावे असा तिला संशय आला होता. त्यामुळे तिने घडलेला प्रकार गोरेगाव पोलिसांना सांगून तिथे तिच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी संगीताविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवून तिचा शोध सुरु केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news