कोल्हापूर ः पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहरात बुधवारी रात्री सिनेअभिनेते गोविंदा लोकसभा प्रचारासाठी आले होते. उत्तरेश्वर पेठ येथे त्यांची सभा झाली. उपस्थितांनी त्यांना डान्सचा आग्रह केला; परंतु महाराष्ट्र दिन असल्याने त्यांनी विनम्रपणे नकार दिला. मात्र, कार्यकर्त्यांनी वाघाची तालीमचे गाणे लावले आणि त्यावर गोविंदाने ठेका धरला. गाण्यावर गोविंदाचे पाय थिरकले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर प्रमुख उपस्थित होते.
सिनेअभिनेते गोविंदा कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांत प्रचारासाठी फिरत आहेत. त्याअंतर्गत काही दिवसांपूर्वी त्यांनी इचलकरंजीत सभा घेऊन डान्सही केला होता. त्यानंतर बुधवारी त्यांची कोल्हापुरात सभा आयोजित केली होती.
यावेळी गोविंदाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसर्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार खा. संजय मंडलिक यांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, शिवसेना युवासेनेचे सचिव ऋतुराज क्षीरसागर, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे व इतर उपस्थित होते.