बारामती ॲग्रोवरील कारवाईला राजकीय स्वरुप नको : अजित पवार

बारामती ॲग्रोवरील कारवाईला राजकीय स्वरुप नको : अजित पवार

बारामती; पुढारी वृत्तसेवा : आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो साखर कारखान्याला आलेल्या नोटीसीसंबधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. कोणतीही कारवाई कधी कोणी जाणून बुजून करत नाही मागच्या वर्षी श्रीनिवास पवार यांच्या शरयू कारखान्याला देखील नोटीस आली होती. आमच्याही अनेक संस्थांना नोटीस आल्या आहेत. पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला देखील नोटीस आली. नोटीस देणारी यंत्रणा त्यांचं ते काम करत असते. नोटीसीला उत्तर दिलं तर तो प्रश्न संपून जातो. या विषयाला राजकिय स्वरुप देवू नये अशी माझी विनंती असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते.

पवार म्हणाले, राज्यात आम्ही तीन वेगवेगळे पक्ष एकत्र आलो आहोत. शनिवारी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मी अशी बैठक झाली. राज्यात वेगवेगळे प्रश्न असतात त्यामुळे आम्ही त्यावर एकत्र बसून चर्चा केली. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने आम्ही चर्चा केली. गणपती झाले, ईद झाली आता छटपूजा आली त्यामुळे त्यावर चर्चा केली. कांदा प्रश्नावर ते म्हणाले, या प्रश्नी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत बैठक होती,परंतु नितीन गडकरी यांच्या अकोल्यातील कार्यक्रमाला ते यावेत अशी गडकरींची अपेक्षा होती,गोयल यांनी या प्रश्नी सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मेळावे घेत असल्याच्या प्रश्नावर पवार म्हणाले, कुणी, कुठे मेळावा घ्यायचा हा ज्याचा त्याचा अधिकार आहे, मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाऊन त्यांचे उपोषण सोडले. काही धनगर बांधव चौंडीला उपोषणाला बसले होते गिरीश महाजन यांनी जाऊन तिथं उपोषण सोडले. देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूरला होते तिथे गेले आणि ओबीसी यांचे उपोषण सोडले. हे प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

निवडणूकीचे तुमच्याकडूनच ऐकतोय

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुध्द सुनेत्रा पवार अशी निवडणूक होणार असल्याच्या बातम्यांबाबत पवार म्हणाले, हे मी तुमच्याकडूनच ऐकतो आहे.

वाघनखांबाबत वस्तुस्थिती समोर यावी

राज्य सरकार ब्रिटन मधून वाघनखे आणत आहे. परंतु त्याबाबत उलटसुलट बातम्या येत आहेत. काही लोकांचं म्हणणं आहे कि वाघ नखे शिवाजी महाराजांनी वापरली आहेत तर काहींचे म्हणणं असे की वापरली नाहीत. या संदर्भात वस्तुस्थिती काय आहे ती समोर आली पाहिजे. यातलं नेमकं काय खरं आहे हे मला माहिती नसल्याने मी माहिती घेईल असे पवार म्हणाले.

काहीही बातम्या उठवू नका

मी पिंपरी चिंचवड मध्ये मी 50 ठिकाणी गणपतीला गेलो. पुण्यात पंधरा ठिकाणी गेलो. मुंबईत लालबाग राजाला गेलो. सिद्धिविनायकाला गेलो. पण वर्षावर मुद्दाम गेलो नाही असे नाही. त्याचा इतका बाऊ करण्याचे कारण नाही. माझी तुम्हाला विनंती आहे कि काहीहीबातम्या उठवत जाऊ नका असे पवार माध्यमाना म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news