सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात विकृतीचा कळस; विनापरवाना घुसलेल्या आरोपीचा घोरपडीवर बलात्कार

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात विकृतीचा कळस; विनापरवाना घुसलेल्या आरोपीचा घोरपडीवर बलात्कार
Published on
Updated on

वारणावती; आष्पा आत्तार : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात गोठणे येथील गाभा क्षेत्रात शस्त्रास्त्रांसह फिरणाऱ्या तीन शिकाऱ्यांना वन्यजीवच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. हे तिन्ही शिकारी नजीकच्या भागांतील गावकरी आहेत. मात्र चौकशीअंती या तीन आरोपींपैकी एका आरोपीने चक्क घोरपडीवर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती तपास करणाऱ्या वनाधिकाऱ्यांना मिळाली आहे.

घोरपडीसारख्या साडेचार फूटांच्या प्राण्यासोबत संभोग करण्याचे घृणास्पद कृत्य करणाऱ्याला आता वनविभाग मानसोपचार तज्ज्ञांच्या हवाली करण्याची तयारी करत आहे. ही घटना वन गुन्ह्यातील अत्यंत दुर्मिळ घटना मानली जात आहे.

व्याघ्र गणनेसाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात लावलेल्या कॅमेऱ्यात ३१ मार्च रोजी शस्त्रांस्त्रासह तीन आरोपी जंगलात जात असल्याचे वनरक्षकांनी पाहिले. त्याने गुन्हा दाखल करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास करून तिघा आरोपींना ताब्यात घेतले. एक आरोपी हातिव गावातून तर दोन आरोपींना रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यातील मारळ येथून ताब्यात घेण्यात आले. या आरोपींचे मोबाईलही वन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.

या तिन्ही आरोपींचे मोबाईल तपासल्यानंतर एका आरोपीने चक्क घोरपडीसोबतच संभोग केल्याचा रेकॉर्डेड व्हिडिओ वनाधिकाऱ्यांच्या हाती लागला. संभोग करताना आरोपीच्या मोबाईलमधून त्याचे चित्रीकरणही केले जात होते. ती घोरपड या घृणास्पद कृत्यानंतर जिवंत राहिली का, आरोपीने इतर कोणत्या वन्यप्राण्यासोबत संभोग केला आहे का, याबाबतची चौकशी सुरु असल्याची माहिती चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे विभागीय वनाधिकारी विशाल माळी यांनी दिली. या तिन्ही शिकाऱ्यांना मिळालेली वनकोठडी ७ एप्रिल रोजी संपत आहे. परंतु चौकशीसाठी अजूनही वाव असल्याने वनाधिकाऱ्यांची टीम हा मुद्दा न्यायालयासमोर मांडणार आहे.

वन्यप्राण्यासोबत संभोग करणे ही फारच विचित्र घटना आहे. ही केस मांडताना सर्व कायदेशीर बाजू न्यायालयासमोर सादर केल्या जातील. यासाठी कायदेतज्ज्ञांची मदत घेतली जाईल.
– विशाल माळी, (विभागीय वनाधिकारी, चांदोली राष्ट्रीय उद्यान)

शिकाऱ्यांनी शिकार केलेल्या प्राण्यांचेही मोबाईलमध्ये चित्रीकरण केले आहे.तसेच शिकार केलेल्या ससा, पॅंगोलिन, साळिंदर, पिसुरी हरिण यांचे फोटोही त्यांच्या मोबाईलमध्ये सापडले आहेत.

तपास अधिकारी, नंदकुमार नलावडे, वनक्षेत्रपाल चांदोली वन्यजीव

सात वर्षे तुरुंगवासाची तरतूद

देशातील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी त्यांना विविध वर्गवारीत संरक्षण दिले जाते. वाघ आणि सिंहाप्रमाणेच घोरपड ही वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत पहिल्या वर्गवारील संरक्षित आहे. त्यामुळे घोरपडीची शिकार किंवा अवैधरित्या तस्करी करणा-याला सात वर्षे सक्त तुरुंगवासाची तरतूद या कायद्यांतर्गत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news