उत्तर प्रदेशातील तरुणाने घातली पाकिस्तानची जर्सी; फोटो व्हायरल झाल्यानंतर नेमके प्रकरण आले समोर

उत्तर प्रदेशातील तरुणाने घातली पाकिस्तानची जर्सी; फोटो व्हायरल झाल्यानंतर नेमके प्रकरण आले समोर

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया कप टी-20 मध्ये रविवारी दुबईत भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या अटीतटीच्या सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला. परंतु या सामन्यादरम्यान उत्तर प्रदेशमधील बरेलीतील एका तरुणाने केलेल्या कृत्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर हा तरुण वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

बरेलीतील मद्य व्यावसायिक संयम जयस्वाल यांचा पाकिस्तानची जर्सी घालून पाठिंबा देणारा फोटो व्हायरल झाला आहे. या छायाचित्रात त्याने पाकिस्तान संघाची जर्सी घातल्याचे दिसून येत आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये संयम जैस्वाल पाकिस्तानी संघाचा टी-शर्ट घालून पाकिस्तानचा झेंडा फडकावताना दिसत आहे. याबाबत हिंदू संघटनांनी एडीजी झोन, आयजी रेंज, बरेली पोलिसांसह अनेक अधिकाऱ्यांना ट्विट करून तक्रार केली आहे. त्यानंतर पोलीस आणि गुप्तचर विभागाने तपास सुरू केला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

बरेलीचा रहिवासी असलेला संयम जैस्वाल आशिया कप टी-20 स्पर्धेतील भारत- पाकिस्तान सामना पाहण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीला गेला होता. त्याला स्टेडियमवर पोहोचण्यासाठी खूप उशीर झाला होता. त्यानंतर तो खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये भारतीय संघाची जर्सी शोधू लागला. परंतु सर्व भारतीय जर्सी विकल्या गेल्या होत्या. त्यामुळे त्याला भारतीय संघाची जर्सी मिळाली नाही. त्यानंतर त्याला पाकिस्तान संघाची जर्सी विक्रीसाठी ठेवलेल्या दिसल्या. त्याने ती विकत घेऊन घातली. त्यानंतर संयम जैस्वाल याचे फोटो सोशल मीडियावरून लगेच व्हायरल झाले. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. उजव्या पक्षाचे कार्यकर्ते हिमांशू पटेल यांनी जैस्वाल याच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे.

मित्राने तो फोटो सोशल मीडियावर टाकला

याबाबत जैस्वाल म्हणाला की, फोटो व्हायरल झाल्याने मी खूप निराश झालो आहे. मी काही मित्रांसोबत फोटो शेअर केले होते. ते सार्वजनिकरित्या कोणी शेअर केले, हे मला माहीत नाही. मी खूप तणावाखाली आहे. माझे वडील, पत्नी आणि मुले अस्वस्थ आहेत. माझ्या संमतीशिवाय आणि माझी बाजू जाणून न घेता माझे फोटो सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या लोकांमुळे मी खरोखरच निराश झालो आहे.

या प्रकरणावर जैस्वाल याचा खुलासा

जैस्वाल पुढे म्हणाला की, इतर अनेकांप्रमाणे मी देखील भारतीय क्रिकेट संघाचा समर्थक आहे. अमेरिकेहून दुबईला आलेल्या मित्रासोबत स्टेडियममधून सामना पाहण्याचा बेत केला होता. मी स्टेडियममध्ये टीम इंडियाची जर्सी शोधत होतो. ती मिळाली नाही म्हणून मी पाकिस्तानची जर्सी घेतली. मी काहीही चुकीचे केलेले नाही. मी पाकिस्तानची जर्सी घातली असली, तरी माझ्या हातात भारतीय ध्वजही होता. माझे वडील हृदयविकाराचे रुग्ण आहेत. या प्रकरणाचा त्यांना मानसिक त्रास होऊ लागला आहे. सगळे मला देशद्रोही म्हणत आहेत. या वादाचा परिणाम आमच्या कुटुंबीयांवर होऊ लागला आहे.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news