डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील आंबिवली ते टिटवाळा स्थानकांच्या दरम्यान असलेल्या बल्यानी गावाजवळ मुंबई-वडोदरा-जेएनपीटी महामार्गाचे काम सुरू आहे. या कामादरम्यान अंडरपास मोर्या बांधण्याचे काम सुरू आहे. या मोरीजवळ खोदण्यात आलेल्या खड्ड्यात साचलेल्या सांडपाण्यात तीन वर्षीय चिमुरडीचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरूवारी सकाळी 11 वाजता घडली आहे. रेहमुनीसा रियाज शहा असे या चिमुरडीचे नाव आहे.
संबंधित बातम्या
या घटनेनंतर मुंबई-वडोदरा-जेएनपीटी महामार्गाच्या निष्काळजी ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप मृत चिमुरडीच्या कुटुंबीयांनी केला आहे. आपल्या तीन वर्षीय मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी नगरसेवक मयूर पाटील यांच्यासह मृत रेहमुनीसाच्या पालकांनी केली आहे.
बल्ल्यानी गावातील एका बैठ्या चाळीत राहणारे चांद शेख शहा यांचे नातेवाईक रियाज शहा हे मीरा-भाईंदरला राहतात. बल्यानी येथे शेख पीर वल्ली शहा बाबा यांचा 27 तारखेपासून उरूस सुरू झाला आहे. या उरूसमध्ये सहभागी होण्यासाठी रियाज शहा हे चांद शहा यांच्या घरी आले आहेत. सोबत त्यांची तीन वर्षाची मुलगी रेहमूनिसा देखील होती. गुरूवारी सकाळी रेहमूनिसा घरात दिसत नसल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला.
याच दरम्यान रेहमूनिसा हिचा मृतदेह चाळी लगत असलेल्या मुंबई-वडोदरा-जेएनपीटी महामार्गाच्या अंडरपास मोरीसाठी खोदलेल्या खड्ड्यातील साचलेल्या पाण्यावर तरंगताना आढळून आला.
या रस्त्याच्या कामाच्या संबंधित ठेकेदाराकडे अंडरपासमध्ये सुरक्षिततेसाठी बेरिगेट्स सारख्या उपाययोजना करण्याची मागणी अनेकदा स्थानिक नागरिकांनी केली होती. मात्र संबंध ठेकेदाराने या मागणीकडे दुर्लक्ष केले. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळेच तीन वर्षाच्या चिमुरडीला आपला जीव गमवावा लागला. या आधी देखील खड्ड्यात पडून दोन ते तीन मुले जखमी झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
दुर्दैवी रेहमूनिसाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संबंधित ठेकेदाराविरोधात सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी नगरसेवक मयूर पाटील यांच्यासह तिच्या कुटुंबीयांनी केली. तसेच ठेकेदाराने मृत मुलीच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावी, अशीही मागणी पाटील यांनी केली आहे.