National Education Policy: आता सेवाज्येष्ठता विसरा, शिक्षकांना परफॉर्मन्सवर पदोन्नती; बदल्याही बंद होणार

National Education Policy: आता सेवाज्येष्ठता विसरा, शिक्षकांना परफॉर्मन्सवर पदोन्नती; बदल्याही बंद होणार

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शालेय शिक्षणात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. टप्प्याटप्प्याने एकेक तरतुदी लागू केल्या जात आहेत. उर्वरित तरतुदी लागू झाल्यास भविष्यात शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती मिळणार नाही. त्यांनाही कार्पोरेट सेक्टरप्रमाणे कामगिरीवरच पदोन्नती दिली जाईल. यासोबतच शिक्षकांच्या बदल्याही बंद होणार आहेत. National Education Policy

केंद्र सरकारने २०२० साली नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मंजूर केले. मात्र, कोरोनामुळे या धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊ शकली नाही. आता टप्प्याटप्प्याने त्याची अमलबजावणी सुरू झाली आहे. गतवर्षी पदव्यूत्तर स्तरावर हे धोरण लागू झाले. येत्या वर्षात पदवीस्तरावरही त्याची पूर्ण अंमलबजावणी सुरू होणार आहे. दुसरीकडे शालेय स्तरावर नवीन शैक्षणिक धोरणातील तरतुदींची टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येत आहे. यंदा काही तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत. यंदापासून आता इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यास सुरूवात करण्यात आली आहे. शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे कामही सुरू झाले आहे. त्यामुळे उर्वरित तरतुदीही हळूहळू लागू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसे झाल्यास शिक्षकांना सेवाज्येष्ठतेऐवजी कामगिरीच्या आधारावरच पदोन्नती मिळू शकणार आहे. National Education Policy

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी ) च्या ५ व्या प्रकरणात मुद्दा क्रमांक १५ ते २१ यामध्ये याबाबत सविस्तर उल्लेख केलेला आहे. यात म्हटले आहे की, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक झाले पाहिजे, त्यांना पदोन्नती दिली पाहिजे. तसेच उत्तम कामगिरी करणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी पगारवाढ दिली पाहिजे. म्हणून कार्यकाळ, पदोन्नती आणि वेतनमान यांचा समावेश असलेली, शिक्षकांच्या प्रत्येक टप्प्यावर एकाहून अधिक स्तर असलेली आणि उत्कृष्ट शिक्षकांना सन्मानित करणारी गुणवत्तेवर आधारित सशक्त व्यवस्था विकसित केली जाईल. कामगिरीचे योग्य मूल्यांकन करण्यासाठी अनेक मापदंडांची, पॅरामीटर्सची यंत्रणा राज्य शासनाद्वारे विकसित केली जाईल. हे मूल्यांकन सहकाऱ्यांद्वारे केले जाईल. उपस्थिती, वचनबद्धता तास आणि शाळा व समाजासाठी केलेली इतर प्रकारची सेवा यावर आधारित असेल. कार्यकाळ किंवा वरिष्ठता याच्या आधारावर पदोन्नती किंवा पगारवाढ होणार नाही. तर ती फक्त अशा प्रकारच्या मुल्यांकनाच्या आधारावर केली जाईल, असेही यात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.

National Education Policy : दरवर्षी ५० तासांचे प्रशिक्षण

सध्या ठराविक कालावधीनंतर शिक्षकांच्या बदल्या होतात. मात्र, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदीनुसार या बदल्याही बंद होणार आहेत. तसेच शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना दरवर्षी प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. हे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने दिले जाणार असून दरवर्षी ते किमान ५० तासांचे असणार आहे.

राज्यातील शैक्षणिक स्थिती

एकूण शालेय विद्यार्थी – १ कोटी ९६ लाख ५६ हजार ८५८

मुले – १ कोटी ३ लाख २८ हजार ३५०

मुली – ९३ लाख २८ हजार ५०८

राज्यातील एकूण शिक्षक – १० लाख

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news