मैत्रिणीबद्दल भडकवत असल्याने अल्पवयीन मुलाची घाटकोपरमध्ये हत्या

file photo
file photo

मुंबई ः पुढारी वृत्तसेवा :  मैत्रिणीबद्दल आक्षेपार्ह बोलून भडकवत असल्याचा राग येऊन ऋषिकेश गुरव या 19 वर्षाच्या मुलाने श्रवण गणेश साळवे या सोळा वर्षांच्या मुलाची हत्या केली. हत्येनंतर पळून गेेलेल्या ऋषिकेश गुरवला दिवा येथून गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. ही घटना रविवारी 21 एप्रिलला सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास घाटकोपर येथील गोळीबार रोड, इंदिरानगर, सूर्यमुती साईबाबा मंदिराजवळ घडली.

सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे गणेश सुडकाजी साळवे हे विक्रोळी परिसरात राहतात. त्यांचा मोठा मुलगा विघ्नेश हा खाजगी कंपनीत कामाला आहे तर श्रवण हा मनपाच्या रात्रशाळेत नववीत शिकत होता. रविवारी सकाळी तो घरातून निघून गेला. काही वेळानंतर त्याची धारदार हत्याराने वार करुन हत्या झाल्याची माहिती घाटकोपर पोलिसांकडून समजताच गणेश साळवे यांनी राजावाडी रुग्णालयात धाव घेतली. तिथे गेल्यानंतर त्यांना शवागृहात नेण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना रक्ताने माखलेला एक मृतदेह दाखविला असता तो मृतदेह त्यांचा मुलगा श्रवण यांचा होता.

घाटकोपर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. या गुन्ह्यांचा गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत होते. गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तावडे यांच्या पथकाने दिवा, दातिवली येथून ऋषिकेशला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच श्रवणची हत्या केल्याची कबुली दिली.

ऋषिकेशची एक मैत्रिण असून तिच्याविषयी श्रवण नेहमी त्याला भडकावत होता. सतत आक्षेपार्ह विधान करुन तिच्यापासून लांब राहण्याचा सल्ला देत होता. त्याच्या त्याच्या मनात राग होता. त्यामुळे रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता त्याने श्रवणला सूर्यमूखी साईबाबा मंदिराजवळ आणले आणि तिथे धारदार शस्त्राने त्याच्यावर वार करुन तो पळून गेला होता.

हत्येनंतर तो घाटकोपर येथून दिवा येथील घरी गेला होता. अटकेच्या भीतीने तो घरातून पळून गेला आणि एका मित्राच्या घरी लपला होता. मात्र त्याला गुन्हा घडल्यानंतर अवघ्या काही तासांत गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी कुठलाही पुरावा नसताना अटक केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news