पणजी : पुढारी वृत्तसेवा नेपाळमधील धनगढी उपमहानगराचे महापौर गोपाल हमाल यांची कन्या आरती हामल (वय ३६) मांद्रेतील ओशो ध्यानधारणा केंद्रामधून बेपत्ता झाली होती. अखेर ती शिवोली येथे मैत्रिणीसोबत आढळली आणि नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला. ती नेपाळमधील धनगढी उप-महानगराचे महापौर गोपाल हमाल यांची कन्या आहे, अशी माहिती मांद्रे पोलिस स्थानकाचे निरीक्षक शेरीफ जॅकीस यांनी दिली. नातेवाईकांनी तक्रार दाखल केल्यानंतर अवघ्या काहीच तासांत गोवा पोलिसांनी तिचा शोध लावला. यामुळे नेपाळच्या महापौरांची चिंता मिटली.
आरती सोमवारी २५ रोजी रात्री ९.३० वाजल्यापासून बेपत्ता झाली होती. मंगळवारी (ता. २६) तिच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर शोध सुरू करण्यात आला होता. मांद्रेतील ओशोंच्या ध्यान केंद्रात सहभागी होण्यासाठी गेलेल्या आरती हमाल हिच्याशी कोणीचाही संपर्क होत नव्हता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिने आपला मोबाईल खोलीतच ठेवला होता. त्यामुळे संपर्क होत नसल्याने वडिलांनी काठमांडू येथील भारतीय दूतावासाच्या माध्यमातून गोवा पोलिसांशी संपर्क साधला होता. 'माझ्या मुलीचा शोध घेण्यासाठी मदत करा', अशी विनंती गोपाल हमाल यांनी समाजमाध्यमावरूनही केली होती.
दरम्यान, तिचा शोध घेण्यासाठी तिची धाकटी बहीण आणि भावोजी गोव्यात पोहोचले होते. त्यांनी पोलिसांत तक्रार देताच पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली होती. पोलिसांनी त्या परिसरातील सगळ्या हॉटेलमध्ये तिचा शोध घेतला. अवघ्या काही तासांत तिचा शिवोलीत शोध लागला. रात्री ती शिवोली येथे तिच्या मैत्रिणीसोबत असल्याचे आढळून आले आणि नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला.
हेही वाचा :