Congress : काँग्रेसमध्ये ‘हा’ बडा नेता घरवापसी करण्याच्या तयारीत

file photo
file photo

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : भारत जोडो यात्रा ही हळूहळू काँग्रेस (Congress) जोडो यात्रा होऊ लागली आहे. यात्रा सुरू झाल्यानंतर काँग्रेसच्या G-23 गटातील नेत्यांची भूमिका मवाळ होऊ लागल्याची चिन्हे दिसत आहे. एकेकाळी काँग्रेसमध्ये महत्त्वाचे नेते मानले जाणारे गुलाम नबी आझाद भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या निकटवर्तीय अंबिका सोनी आझाद यांच्या सतत संपर्कात असल्याचे सूत्रांकडून समजते.

गुलाम नबी आझाद यांनी या वर्षी ऑगस्टमध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्व क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून काँग्रेसला  (Congress) सोडचिठ्ठी दिली होती. पक्षासोबतचा त्यांचा जवळपास 50 वर्षांचा प्रवास संपवला होता. आझाद यांनी जम्मू-काश्मीरच्या राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा करून 'आझाद डेमोक्रॅटिक पार्टी'ची स्थापन केली होती. त्यांच्या या निर्णयानंतर जम्मू-काश्मीर काँग्रेसमध्येही फूट पडून अनेक ज्येष्ठ नेते आझाद यांच्यासोबत गेले होते.

अंबिका सोनी गुलाम नबी आझाद यांच्या संपर्कात

दरम्यान, 'आझाद डेमोक्रॅटिक पार्टी'तून अनेक नेते आता काँग्रेसमध्ये परतू लागले आहेत. त्याचाबरोबर आझाद आता काँग्रेसमध्ये परतण्याबाबत सकारात्मक दिसू लागले आहेत. काँग्रेसनेही त्यांच्या बिनशर्त पुनरागमनाची चर्चा सुरू केली आहे. याबाबत अंबिका सोनी गुलाम नबी आझाद यांच्याशी बोलत आहेत. मात्र, याबाबत अद्याप अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुडा, बिहार काँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह हेही आझाद यांच्या संपर्कात असल्याचे समजते.

Congress : गुलाम नबी आझाद काँग्रेसमध्ये परतण्यास तयार

नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याची घोषणा केली आहे. यानंतर आझाद यांच्यावरील दबावही वाढला आहे. काँग्रेसविरोधात बंड केलेले त्यांचे इतर काही सहकारीही भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याच्या मनस्थितीत आहेत. गुलाम नबी आझाद यांनीही भारत जोडो यात्रेत सहभागी होऊन काँगेसमध्ये परतावे, यासाठी अनेक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्यांचे मन परिवर्तन करू लागले आहेत. त्याचबरोबर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय जयराम रमेश यांनीही आझाद यांना संदेश पाठवला आहे. दरम्यान, गुलाम नबी आझाद काँग्रेसमध्ये परतण्यास तयार आहेत, परंतु, त्यांना गांधी घराण्यातील एखाद्या सदस्याने फोन करावा, अशी त्यांनी मागणी केल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. परंतु पक्ष सोडताना त्यांनी राहुल गांधींवर ज्या प्रकारे वैयक्तिक हल्ला केला, त्यामुळे गांधी कुटुंब आझाद यांचे मन वळवण्याच्या मनस्थितीत नाही.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news