कामा रुग्णालयात 9,127 महिलांचे मॅमोग्राम पद्धतीने स्क्रीनिंग

शस्त्रक्रिया
शस्त्रक्रिया
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  कामा रुग्णालयाच्यावतीने गेल्या मार्चपासून 9 हजार 127 महिलांचे मॅमोग्राम पध्दतीने स्क्रीनिंग करण्यात आले असून 21 महिलांवर स्तनाच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तर 192 महिलांच्या स्तनामध्ये गाठींचे निदान झाले.

महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढत आहे. वेळीच निदान होऊन योग्य उपचार घेतल्यास हा कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. मात्र, अनेकदा महिलांकडून याकडे दुर्लक्ष होते. यासाठीच कामा रुग्णालयालयाच्यावतीने गेल्यावर्षीच्या महिला दिनापासून ते 2024 मधील महिला दिनापर्यंत स्तनाच्या कर्करोगासंबंधी जनजागृती करण्यासाठी मॅमोग्रामपध्दतीने स्क्रीनिंग करण्यात आले.

यामध्ये मुंबईतील मानखुर्द, गोवंडी, धारावी, दक्षिण मुंबईसह रत्नागिरी, पालघर येथे कॅम्प घेण्यात आले. या वर्षभरात 9 हजार 127 महिलांचे मॅमोग्रामद्वारे स्क्रीनिंग केले. यामधील 192 महिलांमध्ये गाठीचे निदान झाले आहे. तसेच 21 महिलांच्या स्तनाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तसेच 8 महिलांच्या स्तनांच्या मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

कर्करोग झालेल्या रुग्णांमध्ये 14 ते 18 टक्के रुग्ण हे स्तनाचा कर्करोग झालेले आढळून येत आहेत. देशभरात दर 21 महिलांमागे एका महिलेला स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका आहे. मात्र अनेकदा महिला याबाबत उघडपणे चर्चा करणे टाळतात. त्यामुळे याचे प्रमाण वाढत आहे. साधारण 35 ते 65 वर्षे वयोगटांतील महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग आढळून येतो. मात्र, गेल्या काही वर्षांत कमी वयातील महिलांमध्येही हे प्रमाण वाढत आहे.

मॅमोग्राम निदान कसे होते

मॅमोग्राम हे एक प्रकारचे निदान चाचणी आणि स्क्रीनिंग साधन आहे. ज्यामध्ये स्तनाचा एक्स-रे केला जातो. हे स्तनाचा कर्करोग किंवा ट्यूमर ओळखण्यासाठी केले जाते. मॅमोग्राफी चाचणी ही अशी प्रक्रिया आहे जी स्तनाचा कर्करोग लवकर ओळखण्यास मदत करते.

महिलांमध्ये वाढत्या स्तनांच्या कर्करोगाबाबत वर्षभर राबवण्यात आलेल्या जनजागृती मोहिमेबद्दल कामा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांना विचारले असता, मॅमोग्राम चाचणीसाठी असलेले अत्याधुनिक यंत्र कोणत्याही जागी सहजरीत्या घेऊन जाणे शक्य असल्याने महिलांचे स्क्रीनिंग मोठ्या प्रमाणात शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news