सूर्य गोचर आज : जाणून घ्या सूर्य संक्रांतीचे महत्त्व; ‘या’ राशींना मोठा दिलासा

Horoscope Today
Horoscope Today

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुर्य हा सर्व ग्रहांचा देव मानला जातो. सूर्य 15 जुनला मिथून राशीत प्रवेश करत आहे. याच बरोबर सूर्याचा वृषभ राशीतील प्रवास थांबणार आहे. जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याला सूर्य संक्रांती असे म्हटले जाते. या काळात धार्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या नद्यांत स्नान करणे आणि दानधर्म करणे लाभाचे ठरते. सूर्याच्या या मिथुन संक्रांती दिवशी मंदाकिनी नदीत स्नान करणे हे विशेष म्हत्त्वाचे मानले गेले आहे. या दिवशी सूर्योदयापासून ते सकाळी 8 वाजून 28 मिनिटांपर्यंतचा कालावधी शुभ आहे. या काळात नदीत स्नान करणे आणि दानधर्म करणे लाभाचे असते. आपण सूर्य संक्रांतीचा कोणत्या राशीवर कसा परिणाम होईल हे जाणून घेऊ.

मेष : प्रवासाची संधी मिळेल

सूर्याचे मिथुन राशीतील गोचर मेष राशीसाठी लाभाचे ठरणार आहे. या काळात प्रवासाची संधी मिळेल. तुमच्यातील ऊर्जा वाढलेली असेल आणि नव्या लोकांशी भेटी-गाटी होतील, या भेटींचा लाभ भविष्यात होईल. तसेच आर्थिक स्थिती चांगली राहील.

वृषभ : स्थावर मालमत्तेतून लाभ

वृषभ राशीच्या लोकांना सूर्य गोचरचे सकारात्मक फायदे या काळात होणार आहेत. 15 जून ते 16 जून या काळात केलेली स्थावर मालमत्तेतील गुंतवणूक तुम्हाला लाभाची ठरेल आणि तुमची श्रीमंती वाढेल. मोठ्या प्रगतीची अपेक्षा आहे. सरकारी नोकरादारांसाठी ही सुवर्ण वेळ असेल. तसेच लाभाचे योग अधिक आहेत.

मिथुन : शेअर बाजारातील गुंतवणुकीमुळे लाभ

सूर्य गोचर तुमच्या राशीत होत आहे. याच्या शुभ प्रभावाने रखडलेली कामे पूर्ण होतील. पद आणि प्रतिष्ठा यात वाढ होईल. नेतृत्व गुण उजळून निघतील आणि तुम्हाला याचा लाभ होईल. शेअर बाजारातील गुंतवणुकीमुळे तुम्हाला आर्थिक लाभ देखील होण्याची शक्यता आहे.

कर्क : आध्यात्मकडे वाढेल

तुम्हाला स्वतःचा शोध घेण्याची तसेच अंर्तमन आणि आध्यात्मिक बाजू समजून घेण्याची संधी मिळेल. या कालावधीत तुम्हाला एकांत आणि आत्मचिंतन यांची गरज भासेल. या दरम्यान तुमचा ओढा गूढ गोष्टी आणि आध्यात्माकडे असेल. भावनिक दृष्टिकोनातून सुधारणा तसेच जुने आघात विसरून जाल. भावनिक पातळीवर तुम्ही मागे पडत होता, त्याची भरपाई या कालावधीत होईल.

सिंह : आर्थिक स्थिती सुधारेल

सूर्याच्या होत असलेल्या गोचरमुळे आर्थिक स्थिती सुधारेल आणि आर्थिक प्रगतीही होईल. दीर्घकाळापासून तुम्ही ज्या नोकरीच्या संधीची वाट पाहात होता, ती संधी तुम्हाला मिळेल. तसेच तुम्हाला ही संधी लवकरच मिळण्याचा योग आहे. व्यापारात असलेल्यांसाठी व्यवसाय विस्ताराची संधी मिळेल आणि गुंतवणुकीचे प्रस्ताव येतील.

कन्या : पदोन्नती मिळेल

सूर्य गोचरमुळे कन्या राशीला संपन्नता आणि भरभराटी मिळेल. नशिबाची साथ लाभेल आणि प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. 15 जून ते 16 जुलै हा तुमच्या करिअरसाठी सुवर्ण काळ ठरेल. तुम्हाला संधी ओळखावी लागेल. या काळात हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल, त्यामुळे तुम्हाला पदोन्नती मिळेल.

तूळ : चिकित्सक वृत्ती वाढेल

गोचर काळात तुमची चिकित्सक वृत्ती वाढेल आणि तुम्ही नव्या कल्पना, नव्या धारणा यांचा शोध घ्याल. तत्त्वज्ञान आणि आध्यात्मिक गोष्टींत रुची घ्याल. तुम्ही नवीन अभ्यासक्रम शिकाल तसेच प्रवासाला जाल. स्वतःचे ज्ञान इतरांच्या उपयोगी ठरेल.

वृश्चिक : संशोधनासाठी उत्तम काळ

वैयक्तिक विकासाकडे लक्ष द्याल, या काळात तुम्ही स्वतःच्या जाणिवा, इच्छा, आकांक्षा यांचा खोलवर अभ्यास कराल. तुमच्यातील सुप्त कलागुण, तुमचे अंतर्मन समजून घेण्याचा प्रयत्न कराल. संशोधन, विश्लेषण यासाठी हा काळ उत्तम आहे. जीवनाच्या विविध पैलूंचे सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न कराल.

धनू : आर्थिक बाजू भक्कम होईल

सूर्याच्या कृपेने धनवृद्धी होईल. तुमची आर्थिक बाजू भक्कम होईल आणि एकापेक्षा अधिक मार्गातून उत्पन्न मिळेल. या वेळी पराक्रम आणि धैर्य यात वृद्धी होईल. विरोधकांचे षड़यंत्र अपयशी होतील. करिअरमध्ये प्रगती होईल. कामाचा विस्तार करण्याचे निश्चित कराल.

मकर : धनलाभ होईल

मकर राशीला सूर्य गोचर लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्हाला धनलाभ होईल. तसेच या काळात वित्तीय लाभ होतील. कर्जातून मुक्ती मिळेल. नोकरदारांचे पद भक्कम होईल. तुम्हाला विविध कंपन्यातून नोकरीच्या संधी मिळतील.

कुंभ : धाडसी वृत्ती वाढेल

तुम्ही नव्या गोष्टी आजमावून पाहाल, तसेच धाडसी वृत्ती आणि खेळकरपणा वाढेल. हा काळ छंद जोपसणे, मनोरंजनाच्या गोष्टींत सहभागी होणे यासाठी उत्तम आहे, आणि तुम्हाला यातून आनंद मिळेल. तुम्हाला व्यक्त होण्यात मदत करणाऱ्या आणि कल्पक गोष्टींचा पाठपुरावा करण्यासाठी हा कालावधी उत्तम आहे. जर तुम्ही सिंगल असाल जीवनात रोमँटिक क्षण येतील.

मीन : प्रगतीचा मार्ग प्रशस्त होईल

सूर्य गोचर तुम्हाला श्रीमंत बनवेल. या काळात तुम्ही नवीन मालमत्ता विकत घ्याल. तुम्ही नवे वाहन, प्लॉट, घर किंवा फ्लॅट विकत घ्याल. नवीन नोकरीच्या दृष्टिकोनातून वेळ शुभ आहे. नव्या संधी शोधून तुम्हाला पुढे गेले पाहिजे. यामुळे तुमच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त होईल. जे नोकरीत आहेत, त्यांची आवडीच्या जागे बदल होईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news