बीड, पुढारी वृत्तसेवा चाईल्ड पोर्नोग्राफीचे पाच व्हिडिओ वेगवेगळ्या वेबसाईटवर बीड जिल्ह्यातून अपलोड झाल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र सायबर क्राईम विभागाने ही माहिती बीडच्या सायबर पोलिसांना दिली असून यावरुन आता पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरु असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गात यांनी दिली.
बीड जिल्ह्यात गेल्या काही काळात धक्कादायक घटना समोर येत आहेत. यात आता आणखी एका प्रकाराची भर पडली आहे. बीड जिल्ह्यातून चाईल्ड पोनोग्राफी कंटेट असलेले पाच व्हिडिओ वेगवेगळ्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आल्याची धक्कादायक माहिती महाराष्ट्र सायबर क्राईम विभागाला मिळाली. हा धक्कादायक प्रकार लक्षात आल्यानंतर तत्काळ याबाबतची माहिती बीडच्या सायबर पोलिस स्टेशनला कळविण्यात आली असून, आता त्यानुसार पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणांचा आता तपास सुरु असून यातील काही माहिती हाती आल्यानंतरच या प्रकरणांबाबत स्पष्टता येऊ शकेल अशी माहिती पोलिस निरीक्षक डी.बी. गात यांनी दिली.
बीडमध्ये रॅकेट कार्यरत?
महाराष्ट्र सायबर क्राईमच्या अधिकार्यांना वेगवेगळ्या वेबसाईटवर बीडमधून व्हिडिओ अपलोड करण्यात आल्याचे निदर्शनास आले. यामुळे आता बीडमधून केवळ व्हीडीओ अपलोड करण्यात आले की यामागे एखादे रॅकेट कार्यरत आहे? किंवा केवळ प्रशासनाची दिशाभूल करण्यासाठी बीडमधील लोकेशनचा वापर करण्यात आला? असे प्रश्न उपस्थित होत असून याचा शोध आता सायबर विभागाला घ्यावा लागणार आहे.
चाईल्ड पोर्नोग्राफ ही मानसिक विकृती आहे, त्या साईटला व्हीजीट करणे, व्हिडिओ तयार करणे, फॉरवर्ड करणे हा गुन्हा आहे, याची माहिती सायबर विभागाकडे असते. या प्रकरणांचा तपास लवकरच लावला जाईल. कोणी असे व्हीडीओ शेअर करु नये. या प्रकरणांमध्ये पाच गुन्हे दाखल झाले असून तपासही करण्यात येत आहे. यातील आरोपी लवकरच निष्पन्न होतील.
नंदकुमार ठाकुर, पोलिस अधिक्षक, बीड