नागपूर : पुढारी वृत्तसेवा अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत अभिनेता गोविंदा यांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला. आज (शुक्रवार) नागपुरात त्यांचे आगमन झाले. यावेळी माजी मंत्री डॉ. दीपक सावंत उपस्थित होते. विदर्भातील रामटेक, यवतमाळ आणि बुलढाणा या तीन मतदारसंघात गोविंदा यांच्या सभा होणार आहेत.
माझ्यासाठी ही नवी राजकीय सुरुवात असली तरी माईच्या आशीर्वादाने ती यशस्वी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेना उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी प्रभू रामाच्या पदस्पर्शाने पावन रामटेकच्या भूमीत आलो. कुठल्या राजकीय मुद्यांवर भर असेल हे विचारले असता त्यांनी ते सभेत बोलणार असल्याचे सांगत वेळ मारून नेली.
अभिनेता गोविंदा शिवसेनेच्या तिकिटावर मुंबईतून निवडणूक लढणार का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर गोविंदा यांनी आपण निवडणूक लढणार नाही, तर शिवसेनेचा प्रचार करणार अशी भूमिका गोविंदाने जाहीर केली. पहिल्या टप्प्यात 4 ते 6 एप्रिल दरम्यान गोविंदा नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघात शिवसेना व महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहे.
यानंतर 11 व 12 एप्रिल रोजी यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करतील 15 आणि 16 रोजी हिंगोली मतदारसंघात प्रचाराला जाणार आहेत. दरम्यान, 17 आणि 18 एप्रिल रोजी गोविंदा शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी पुन्हा विदर्भातील बुलढाणा मतदारसंघात येणार आहेत.
हेही वाचा :