बीडमध्ये अनोखी परंपरा : धुलिवंदन दिवशी जावयाची गाढवावरुन मिरवणूक | पुढारी

बीडमध्ये अनोखी परंपरा : धुलिवंदन दिवशी जावयाची गाढवावरुन मिरवणूक

केज; पुढारी वृत्तसेवा : गर्दभ सवारीसाठी ताब्यात घेतलेला एक जावई ऐनवेळी सर्वांना गुंगारा देऊन पळून गेल्यामुळे गावकर्‍यांनी दुसरा एक वकील जावई शोधला; मात्र त्यांनी गावकर्‍यासोबत युक्तिवाद करून सुटका करून घेतल्याने गावकर्‍यांची दमछाक झाली. पण अखेर ग्रामस्थांनी तिसरा व्यावसायाने ड्रायव्हर असलेला जावई पकडून आणून त्याची गाढवावर बसवून मिरवणूक काढलीच.

बीड जिल्ह्यातील विडा या गावात अनोखी परंपरा असून धूलिवंदनाच्या दिवशी येथे जावयाला पकडून आणून त्याची वाद्यांच्या ताला सुरात मिरवणूक काढली जाते. जावयाला गाढवावर बसविले जाते. मात्र या वर्षी जावई शोधण्यात गावकर्‍यांना खूप पळापळ करावी लागल्याने चांगलीच दमछाक झाली. गावकर्‍यांनी ऐन होळीच्या सणा दिवशी शेजारच्या बुरुंडवाडी येथील अशोक सोनवणे या अंकुश पवार यांच्या जावयाला ताब्यात घेतले होते. मात्र सायंकाळी 6 वाजता अशोक भोसले हे सर्वांच्या हातावर तुरी देऊन पळून गेले. गाढवावर बसवून मिरवणुकीची तयारी सुरू करण्यापूर्वीच गावकर्‍यांनी ताब्यात घेतलेला हा मेकॅनिक जावई बहाद्दर निघाला. त्याने गावकर्‍यांना गुंगारा दिला.मात्र त्या नंतर गावकर्‍यांनी चक्क एका वकील जावईच ताब्यात घेतला. मात्र वकील जावयाने बुद्धी चातुर्याने युक्तिवाद करून सुटका करून घेतली. मग मात्र गावकरी हैराण झाले. तिसर्‍या एका टॅ्रक्टर चालक असलेल्या जावयाला याची कुणकुण लागल्याने शेतात जाऊन लपून बसलेला शिंदी येथील संतोष जाधव हे एकनाथ पवार यांचे जावई ताब्यात घेऊन त्याची गाढवावरून मिरवणूक काढली. यावेळी गावातील आबालवृद्ध महिला सहभागी झाले होते संतोष जाधव यांना गाढवावर बसवून गळ्यात हार घालून आणि गाढवाच्या गळ्यात खेटरांची माळ घालून डीजेच्या तालात मिरवणूक काढली.

मिरवणूक मारुती मंदिराच्या पारावर येताच सरपंचांनी पप्पू जाधव यांना कपड्यांचा आहेर केला आणि पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी घातली. ही परंपरा कायम ठेवण्यासाठी सरपंच सूरज पटाईत, संयोजन समितीचे कार्यवाह विनोद ढोबळ, गोवर्धन वाघमारे, बापू देशमुख, अविनाश ढोबळे, पप्पू सिरसाट, संतोष अहिरे, महादेव पटाईत, नवनाथ गायकवाड, कैलास वाघमारे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.

Back to top button