Lok Sabha elections 2024 : चंद्रपूर लोकसभेसाठी प्रतिभा धानोरकरांना काँग्रेसची उमेदवारी  | पुढारी

Lok Sabha elections 2024 : चंद्रपूर लोकसभेसाठी प्रतिभा धानोरकरांना काँग्रेसची उमेदवारी 

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Lok Sabha elections 2024 : काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी आमदार प्रतिभा धानोरकर यांना दिली आहे. गेले काही दिवस काँग्रेसमध्ये चंद्रपूर लोकसभेवरून सुरू असलेला तिढा अखेर सुटलेला आहे. चंद्रपूरची लढत आता प्रतिभा धानोरकर विरुद्ध सुधीर मुनगंटीवार अशी होणार आहे.
देशातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघांना समावेश आहे. यामध्ये नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या मतदारसंघांचा समावेश आहे. यापैकी चंद्रपूर वगळता चारही मतदारसंघाचे उमेदवार काँग्रेसने यापूर्वीच घोषित केले आहेत. मात्र, चंद्रपूरचा तिढा कायम होता. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवर हेही या ठिकाणाहून लोकसभा लढू शकतात अशा चर्चा होत्या. त्यांच्या कन्या युवक काँग्रेसच्या नेत्या शिवानी वडेट्टीवार यादेखील या जागेसाठी इच्छुक होत्या. मात्र पक्षाने अखेर विद्यमान आमदार आणि चंद्रपूर लोकसभेचे दिवंगत खासदार सुरेश (बाळू) धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे.
चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्यानंतर आता काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर विरुद्ध भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार अशी लढत होणार आहे.

काँग्रेसच्या पाचव्या यादीत तीन उमेदवार

काँग्रेसने पाचव्या यादीत एकूण तीन उमेदवार घोषित केले. यामध्ये महाराष्ट्रातुन चंद्रपूरसाठी प्रतिभा धानोरकर तर राजस्थानच्या दौसा येथून मुरारी लाल मीना यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राजस्थानच्या जयपूरमधून उमेदवार बदलून प्रतापसिंह खाचरीयावास यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी याठिकाणी सुनील शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली होती.

Back to top button