अखेर भाजपाची उमेदवारी मुनगंटीवार यांच्या गळ्यात! | पुढारी

अखेर भाजपाची उमेदवारी मुनगंटीवार यांच्या गळ्यात!

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुक 2024 च्या उमेदवारांची दुसरी यादी आज (बुधवारी, १३) जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांचाही समावेश आहे. विदर्भातील चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रामधुन दिल्ली वारी करण्यासाठी पक्षाने राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. ना.मुनगंटीवार यांनी इच्छुक नसल्याचे संगीतल्यावरही उमेदवारी जाहीर झाल्याने भाजपा कार्यकर्त्यांत “कहीं खुशी कहीं गम”चे वातावरण दिसून येत आहेत.

चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवारीसाठी माजी केंद्रीय मंत्री तथा केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर हे पुन्हा एकदा इच्छुक होते. त्यांच्या पाठोपाठ ओबीसी नेते डॉ.अशोक जीवतोडे, डॉ गजेंद्र आसुटकर(यवतमाळ) हे इच्छुक होते. मात्र यंदा पक्षाने राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना संधी दिली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वी दोन वेळा (1989 व 1991) चंद्रपूर लोकसभा लढविली आहे. त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.यंदा मात्र चित्र पालटले आहे.यंदा 400 पारचा नारा भाजपाने दिला आहे.मुनगंटीवार हे 1995 पासून आमदार आहेत. दांडगा अनुभव व त्यांची सुक्ष्मनियोजन शैली व सर्वमान्य नेतृत्व या पार्श्वभूमीवर ही उमेदवारी असल्याचे बोलले जात आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीरपणे आपण राज्यातच राहण्यास इच्छुक असुन लोकसभा निवडणूक लढविण्यास आपला रस नसल्याचे सांगितले होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी दिल्ली वारी केली आणी तेव्हाही त्यांनी लोकसभा लढविण्यास इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले होते. असे असतांना उमेदवारी कां..? असा प्रश्न आता उपस्थित केला जात असून वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.

मुख्यमंत्र्यांना साकडे पण…

दोन दिवसांपूर्वी काल मंगळवारी ना सुधीर मुनगंटीवार यांनी, चंद्रपूरच्या काष्ठने निर्मित नवीन संसदभवनाच्या दारातून मला जावे लागेल की काय..? याची मला भीती वाटत आहे असे सांगून,ती एन्ट्री थांबविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीरपणे साकडे घातले होते. त्यांनंतर दुसऱ्याच दिवशी आज बुधवारी ना.मुनगंटीवार यांच्या नावाची लोकसभा उमेदवारीवर घोषणा झाल्याने,पक्षाचा आदेश त्यांना आता मान्य करावाच लागणार आहे.

‘त्या’ चर्चेला विराम मिळाला

त्यांच्या कार्यशैलीमुळे सुधीर मुनगंटीवारांचे भाजपात विशेष महत्व आहे. त्यांच्या भावना लक्षात घेत पक्ष ना.मुनगंटीवार यांची उमेदवारी रद्द करेल. आणि भाजपा ही उमेदवारी आ. प्रतिभा धानोरकर यांना देईल अश्या चर्चा रंगू लागल्या होत्या,त्या चर्चांना आता विराम मिळाला आहे.

Back to top button