' मला सत्तेत येण्यासाठी आशीर्वाद देऊ नका, मी गरीबांच्या सेवेसाठी आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी | पुढारी

' मला सत्तेत येण्यासाठी आशीर्वाद देऊ नका, मी गरीबांच्या सेवेसाठी आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : मला सत्तेत येण्यासाठी आशीर्वाद देऊ नका. मी गरिबांच्या सेवेसाठी आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 83 व्या ‘मन की बात’ कार्यक्रमात बोलताना केले. आयुष्यमान भारत योजनेचा एक लाभार्थी राजेशकुमार प्रजापती याने सदर योजनेचा चांगला लाभ आपल्याला झाला असल्याचे मोदी यांच्याशी संवाद साधताना सांगितले. त्यानंतर आपल्याला सदैव सत्तेत पाहायचे आहे, असे उद्गार प्रजापती याने काढले. त्याला उत्तर देताना मी गरीबांच्या सेवेसाठी आहे.असे मोदी म्हणाले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपल्याला शिकण्याची तसेच देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देतो, असे सांगून मोदी म्हणाले की, देशातील सर्वसामान्य लोक असोत, सरकारे असोत. पंचायतीपासून ते संसदेपर्यंत असो. सर्व ठिकाणी अमृत महोत्सवाचा पुकार आहे. आणि या महोत्सवाशी संबंधित कार्यक्रम देशाच्या विविध भागात सुरू आहेत. स्वातंत्र्य संग्रामात झाशी आणि बुंदेलखंड या भागाचे किती मोठे योगदान आहे, हे सर्वांनाच माहिती आहे, असेही ते म्‍हणाले.

निसर्गापासून आपल्याला त्याचवेळी धोका निर्माण होतो, ज्यावेळी आपण त्याचे संतुलन बिघडवतो किंवा त्याची पवित्रता नष्ट करतो. निसर्ग मातेप्रमाणे आपले पालन करते आणि आपल्या जगात नवे नवे रंग देखील भरते, हे सदैव लक्षात ठेवले पाहिजे, असे मोदी यांनी नमूद केले. डिसेंबर महिन्यात देश नौसेना दिवस, सशस्त्र सेना ध्वज दिवस साजरा करतो. येत्या 16 डिसेंबर रोजी देश 1971 च्या युद्धाची सुवर्ण जयंती साजरी करीत आहे, असे सांगतानाच मोदी यांनी आयुष्यमान भारत योजना आणि स्टार्ट अप योजनेचाही आढावा घेतला.

स्टार्ट अपच्या जगामध्ये आज भारत आघाडीवर आहे, असे सांगून मोदी पुढे म्हणाले की, देशातील 70 स्टार्ट अप्सचे मूल्य आता एक अब्ज डॉलर्सच्या पुढे गेले आहे. असंख्य भारतीय स्टार्ट अप्स जगातील विविध समस्यांसाठी उपाय उपलब्ध करून देत आहेत. वर्ष 2015 मध्ये देशात अवघी 9 ते 10 युनिकॉर्नस (स्टार्ट अप्स) कार्यरत होती; पण आता या क्षेत्रात भारत जगात आघाडीवर आहे. वर्षागणिक स्टार्ट अप्समध्ये विक्रमी प्रमाणात गुंतवणूक होत आहे. तमाम देशवासियांना याचा भविष्यात फायदा होणार आहे, असेही पंतप्रधान माेदी यांनी स्‍पष्‍ट केले.

हेही वाचलंत का?

Back to top button