गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आज दापोलीत;अनेकांचे पक्ष प्रवेश, राजकीय हालचालींना वेग | पुढारी

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आज दापोलीत;अनेकांचे पक्ष प्रवेश, राजकीय हालचालींना वेग

दापोली; प्रवीण शिंदे दापोली मतदारसंघात भाजपने पक्ष वाढीसाठी कंबर कसली असून राजकीय हालचालींना देखील वेग आला आहे. आज दि 27 रोजी सायंकाळी 7 वाजता दापोली येथील राधाकृष्ण मंदिर येथे गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी पक्ष प्रवेश देखील घेतले जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याआधीच दापोलीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्या अनुषंगाने भाजप आपल्या पक्षाची ताकद वाढविण्याची तयारी दापोलीत करत आहे.

दापोलीत भाजप पक्षाची राजकीय ताकद कमी असली तरी त्यांची मते ही निर्णयक आहेत. त्यामुळे दापोलीत भाजप अनेकवेळा किंगमेकर ठरले आहे. राज्यात भाजप, शिंदेंची सेना, आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी असे समीकरण जुळून आल्या नंतर आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दापोली तालुक्यात आणि रत्नागिरी जिल्ह्यात विशेष लक्ष दिल्याने कोट्यवधींची कामे जिल्ह्यात आणि दापोली मतदारसंघात आली आहेत. तर विकास कामांमुळे अनेकांचा कल भाजप पक्षाकडे दिसत आहे. दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी भाजप पक्षात प्रवेश केल्यानंतर दापोलीत पहिल्यांदाच कार्यकर्ता मेळावा असणार आहे. त्यामुळे सूर्यकांत दळवी हे नेमके आजच्या या मेळाव्यात आपला ठसा कसा उमटवणार हे देखील दिसणार आहे.

दापोली शिंदे गटाने दाभोळ येथे भाजप पक्षाला खिंडार पाडत अनेक भाजप कार्यकर्त्यांचा प्रवेश करून घेतला होता. त्यामुळे दापोलीत आज भाजप पक्ष प्रवेश घेताना कोणत्या पक्षाला खिंडार पडणार हे देखील दिसणार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे दापोलीत ठिकठिकाणी आगमनाचे बॅनर लागले आहेत. त्यामुळे सावंत यांचे दौऱ्याला महत्व आले आहे.

हेही वाचा :

Back to top button