सिंधुदुर्ग : माजी आमदार परशुराम उपरकर व समर्थक सत्ताधारी पक्षात प्रवेश करणार | पुढारी

सिंधुदुर्ग : माजी आमदार परशुराम उपरकर व समर्थक सत्ताधारी पक्षात प्रवेश करणार

कुडाळ; पुढारी वृत्तसेवा : माजी आमदार परशुराम (जीजी) उपरकर यांनी मनसेचा राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर उपरकर समर्थक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी रविवारी (दि. १८) कुडाळ येथील ओंकार डिलक्स हाॅलच्या सभागृहात निर्धार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात उपरकर यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश करणार असल्याची भूमिका जाहीर केली आहे. या भूमिकेनंतर आता सिंधुदुर्गमध्ये मोठा राजकीय बदल होणार अशी चर्चा आहे.

कुडाळ येथील निर्धार मेळाव्यात बोलत असताना माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर म्हणाले, मनसेत असताना पक्ष संघटना वाढविण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले. परंतु आम्ही आता मनसे पक्ष सोडला असून, आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी राज्यातील सत्ताधारी पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून कोणत्या पक्षात जायचे याचा योग्य तो निर्णय घेण्यात येणार असून, येत्या पंधरा दिवसांत सिंधुदुर्ग जिल्ह्यातच हा मोठा पक्ष प्रवेश होईल. आगामी काळात सत्ताधारी पक्षात राहून जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडविणे तसेच जनतेची सेवा करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे असे उपरकर म्हणाले.

आम्ही मनसे पक्ष सोडला आहे. त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष जरूर वाढवावा, आम्ही आता हस्तक्षेप करणार नाही. मात्र आमच्या सोबत आलेल्या कार्यकर्त्यांना धमक्या, दमदाटी कोणी केल्यास त्यांना आम्ही सोडणार नाही. मनसे पक्ष निरिक्षकांनी जिल्ह्यात येऊन आमच्यावर विनाकारण टिका केल्यास आमचे कार्यकर्ते त्यांची वस्त्रे उतरवतील, एवढे लक्षात ठेवावे, असा इशाराही माजी आमदार श्री. उपरकर यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिला.

Back to top button