भंडारा-गोंदिया लोकसभेची भाजपची वाट मोकळी;  खा. प्रफुल्ल पटेलांना राज्यसभेच्या उमेदवारीनंतर चित्र स्पष्ट  | पुढारी

भंडारा-गोंदिया लोकसभेची भाजपची वाट मोकळी;  खा. प्रफुल्ल पटेलांना राज्यसभेच्या उमेदवारीनंतर चित्र स्पष्ट 

गोंदिया; पुढारी वृत्तसेवा : अजित पवार गटाने भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात भाजपा-शिवसेना(शिंदे गट) व राकॉं (अजित पवार गट) कडून उमेदवार कोणत्या पक्षाचा राहणार यावरून भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात राजकारण तापले होते. मात्र, आज प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल केल्यामुळे सर्व अटकळांना पूर्णविराम लागला आहे. तर या मतदारसंघातील तिकीटाला घेऊन भाजपची वाटही मोकळी झाली आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात भाजपचे खासदार असून सद्यःस्थितीत भाजपसह शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीचे सरकार आहे. तर युतीकडून भंडारा/गोंदिया लोकसभा मतदार संघातून प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली होती. दरम्यान, राज्यातील 6 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर 27 फेब्रुवारी रोजी निवडणूक होत असून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे राज्यसभेच्या 5 जागा जिंकू शकण्याएवढे बहुमत आहे. त्यातच खासदार प्रफुल्ल पटेल हे 2028 पर्यंत खासदार राहणार आहेत. असे असताना राष्ट्रवादीकडून त्यांना रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. तर आज त्यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखलही करण्यात आलेला आहे. तेव्हा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल राज्यसभेसाठी जाण्याने आता गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचा दावा संपला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूकीत भंडारा/गोंदिया मतदार संघातून भाजप लढणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, भाजपकडून लोकसभेच्या उमेदवारीवरून इच्छुकांची मोठी यादी असून सद्याचे खासदार सुनील मेंढे यांच्यासह जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके, माजी आमदार हेमंत पटले, विजय शिवणकर आदी मोठी नावे आहेत. त्यातच भाजपचा उमेदवार ठरल्यानंतरच कॉंग्रेस आघाडीचे पत्ते उघडणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गेल्या आठवडय़ात पत्र परिषदेतून स्पष्ट केले आहे. तेव्हा भाजपकडून उमेदवारी कुणाला मिळणार? याकडे गोंदिया व भंडारा दोन्ही जिल्ह्यातील मतदारांसह विरोधकांचेही लक्ष लागले आहे.

Back to top button