चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेडमधून अनेकांचे समर्थन; रॅपनवाड काँग्रेसमध्येच राहणार

चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेडमधून अनेकांचे समर्थन; रॅपनवाड काँग्रेसमध्येच राहणार
Published on
Updated on

नांदेड; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अपेक्षेप्रमाणे मंगळवारी भाजपात प्रवेश केल्यानंतर माजी खासदार भास्करराव खतगावकर यांच्यासह काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले. जिल्ह्यात या पक्षाला मोठी गळती लागणार असली, तरी नायगावचे माजी आमदार वसंतराव चव्हाण विचारविनिमय करून निर्णय घेणार आहेत तर भारतयात्री डॉ. श्रावण रॅपनवाड यांनी काँग्रेससोबत राहण्याची भूमिका स्पष्ट केली.

अशोक चव्हाण यांनी सोमवारी (दि. १२) काँग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा अचानक राजीनामा दिल्यानंतर तेथे एकच खळबळ उडाली होती. स्थानिक नेते आणि प्रमुख कार्यकर्त्यांना पूर्वकल्पना न देताच चव्हाण यांनी मोठा राजकीय निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनीही काँग्रेस सदस्यत्व तसेच पदाचा राजीनामा दिला; पण स्थानिक पातळीवर पहिल्या दिवशी प्रमुख नेत्यांनी सावधगिरी बाळगली.

या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी आपल्या काही सहकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर अशोक चव्हाण यांनी घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा देत भाजपात जाण्याच्या निर्णयाचे मंगळवारी (दि. १३) येथे स्वागत केले. २०१४ साली खतगावकर यांनी चव्हाणांची साथ सोडून अनेक सहकार्‍यांसह भाजपात प्रवेश केला होता. पण ५ वर्षांनंतर त्यांच्यासह माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, अविनाश घाटे, श्रीराम पाटील राजूरकर व इतरांनी घरवापसी केली. आता या सर्वांनीच चव्हाणांच्या समर्थनाची भूमिका घेत भाजपत जाण्याची तयारी दर्शविली.

राष्ट्रवादी काँग्रेसची पार्श्वभूमी असलेले नायगावचे माजी आमदार वसंतराव चव्हाण २००९ पासून काँग्रेस पक्षासोबत आहेत. पण अशोक चव्हाण यांच्या भाजपत जाण्याच्या निर्णयाचे त्यांनी अद्याप समर्थन केलेले नाही. नायगाव व इतर दोन तालुक्यातील कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करून आपण निर्णय घेणार आहोत, असे चव्हाण यांनी मंगळवारी स्पष्ट केले. वरच्या पातळीवर काँग्रेस आणि शरद पवार गट यांच्यात काही वेगळा निर्णय झाला तर वसंतराव भाजपात जाणार नाहीत, असा अंदाज वर्तविला जात आहे.

काँग्रेस पक्ष सोडण्याचा तसेच २४ तासातच भाजपात जाण्याचा निर्णय करताना चव्हाण यांनी जिल्ह्यातील पक्षाच्या आमदारांशी चर्चा केली नव्हती. परंतु जिल्ह्यातील पक्षाचे विद्यमान आमदार पुढील टप्प्यात चव्हाण यांच्यासोबत जाण्याची चर्चा पक्षातून होत आहे. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदराव नागेलीकर यांच्यासह बहुसंख्य तालुकाध्यक्षही चव्हाण-राजूरकर यांच्यासोबत जाण्याची शक्यता असल्यामुळे नवीन मोंढा भागातील जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्यालय अक्षरशः ओस पडणार आहे. पक्षाचे शहर उपाध्यक्ष श्याम दरक, प्रवक्ते संतुका पांडागळे यांनीही पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

नांदेड जिल्ह्यातील बहुतांश काँग्रेस नेेते व त्यांचे समर्थक अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ भाजपाच्या यात्रेत सहभागी होण्याच्या तयारीत दिसत असताना खा.राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत कन्याकुमारीपासून काश्मिरपर्यंत सहभाग नोंदविणारे भारतयात्री श्रावण रॅपनवाड यांनी मात्र काँग्रेस पक्षासोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे त्यांच्या संपर्कात असून त्यांनी त्यांच्यावर काही जबाबदार्‍या सोपविल्या असल्याची माहिती मिळाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news