हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील डिग्रसवाणी शिवारात झालेल्या अपघातातील तीन जणांच्या मृत्यू प्रकरणात घातपात झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पोलीस तपासात मुलानेच आई, वडिल व भावाचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. अनैतिक संबंधाला होणाऱ्या विरोधातून त्याने तिघांचा काटा काढल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. बासंबा पोलिसांनी त्यांच्या आरोपीस अटक केली आहे.
तालुक्यातील डिग्रसवाणी शिवारात गुरुवारी (दि. ११) सकाळी तिघांचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यामध्ये आढळून आला. कुंडलीक श्रीपती जाधव (६५), कलावती कुंडलीक जाधव (६०), आकाश कुंडलीक जाधव (२५) अशी मयतांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यामध्ये कुंडलिक जाधव यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांना उपचारासाठी मुलगा आकाश हा सिरसम येथे घेऊन जात होता. यावेळी त्याची आई कलावतीबाई या त्यांच्या सोबत होत्या. डिग्रसवाणी येथून काही अंतरावर असलेल्या एका वळणावर आकाश याला दुचाकीवर नियंत्रण मिळविता आले नाही. त्यामुळे दुचाकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पडून तिघांचाही मृत्यू झाल्याचे त्यांचा मुलगा महेंद्र जाधव याने पोलिसांना सागितले होते. मात्र घटनास्थळावरील परिस्थिती व इतर संशयास्पद बाबी लक्षात घेऊन पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील यांनी या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश बासंबा पोलिसांना दिले.
त्यावरून बासंबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी, जमादार नाना पोले, खिल्लारे, खंडेराव नरोटे यांच्या पथकाने घटनास्थळी तसेच मयतांच्या घरी जाऊन पाहणी केली. तीनही मयतांच्या घरामध्ये स्वच्छता केलेली दिसून आल्याने पोलिसांच्या मनात संशयाची पाच चुकचुकली. पोलिसांनी मयत जाधव दांम्पत्याचा मुलगा महेंंद्र यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता त्याने तिघांचा खून करून डिग्रसवाणी शिवारात टाकून दिले व अपघाताचा बनाव केल्याचे चौकशीमध्ये सांगितले आहे. पोलिसांनी रविवारी सायंकाळी त्यास अटक केली आहे.
या प्रकरणात महेंद्र जाधव याचे गावात एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्या संबंधाला त्याचे वडिल कुंडलीक जाधव, आई कलावती जाधव व भाऊ आकाश जाधव यांचा विरोध होता. त्यामुळे त्यांच्यात वाद होत होते. या वादातून त्याने बुधवारी रात्री वडिल व भाऊ यांचा खून केला. त्यानंतर आईला सोबत नेऊन डिग्रसवाणी शिवारात मारले. त्या ठिकाणी तिघांनाही दुचाकीसह फेकून देत अपघाताचा बनाव केल्याचे पोलिसांनी सांगितले.