छत्रपती संभाजीनगर : परीक्षा रद्द करून सरसकट फेलोशिप द्या; संशोधक विद्यार्थ्यांचा ठिय्या | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : परीक्षा रद्द करून सरसकट फेलोशिप द्या; संशोधक विद्यार्थ्यांचा ठिय्या

छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्‍तसेवा सारथी, बार्टी, महाज्योती संशोधन शिष्यवृत्तीसाठी झालेल्या संयुक्त प्रवेशपूर्व परीक्षेनंतर संशोधक विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. परीक्षा रद्द करून सरसकट फेलोशिप देण्याची मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्यातर्फे संशोधन शिष्यवृत्ती पात्रता परीक्षा घेण्यात येते. राज्यभरातील विविध चार शहरातील पाच परीक्षा केंद्रावरुन १० जानेवारी रोजी परीक्षा घेण्यात आली. प्रवेशपूर्व परीक्षा सकाळी १० वाजता सुरू झाली. विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात वितरीत करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका खुल्या पद्धतीच्या होत्या असे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यासह काही विद्यार्थ्यांना छायांकित प्रती देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी यावर आक्षेप घेतला. यावर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त करत परीक्षा केंद्रावर ठिय्या मांडला.

यावेळी विद्यार्थी, प्रशासन यांच्यात वाद निर्माण झाला आणि पोलिसांना पाचारण करण्यात आले. फेर परीक्षा घेण्यात यावी, अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी महाविद्यालय दणाणून सोडले. २४ डिसेंबर च्या परीक्षेत झालेल्या गोंधळानंतर पुन्हा आजच्या प्रकारामुळे परिक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मागील काळात गैरप्रकार पाहता परीक्षेतील परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी आजच्या प्रकाराबाबतही नाराजी व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये देवगिरी महाविद्यालयात ही परीक्षा घेण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रातील छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, लातुर, बीड, जालना, लातूर, धाराशिवसह जळगाव, नंदुरबार आदी जिल्ह्यातील विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button