

उमरखेड; पुढारी वृत्तसेवा : भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा निवडणूकीच्या संदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे दौऱ्यावर होते. या संपर्क दौऱ्याच्या अनुषंगाने राजस्थानी भवन येथे बावनकुळे बैठकीकरिता आले होते. यावेळी सकल मराठा समाजाच्या आंदोलक आणि कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला. "एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे" अशा घोषणा देत राज्य सरकारबद्दल रोष व्यक्त केला. विशेष म्हणजे या बैठकीत उपस्थित असलेले डीवट पिंपरी तालुका उमरखेड येथील भाजपचे सक्रीय कार्यकर्ते गुलाब सूर्यवंशी यांनी सुद्धा घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सुरात सूर मिसळत घोषणा देऊन भाजपला घरचा आहेर दिला आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना तातडीने सभागृहाबाहेर काढून दिल्याने वाद निवळला.
उमरखेड येथे सकाळ मराठा समाजाने आरक्षण मिळे पर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. हिंगोली लोकसभा अंतर्गत उमरखेड, हदगांव, किनवट विधानसभा मतदार संघातील १०० वॉरीयर्सच्या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे आले होते. यावेळी त्यांना सकल मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. यामुळे संतप्त मराठा बांधवानी यावेळी बावनकुळे यांना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला आणि घोषणाबाजी केली. पोलिसांनी तात्काळ पावले उचलत आंदोलकांना अटक केली. यावेळी पोलिसांनी मराठा आंदोलकांना स्थानबद्ध करुन गुन्हा दाखल केला आहे. यावेळी सचिन घाडगे ,सरोज देशमुख ,प्रमोद देशमुख ,गजानन देशमुख भांबरखेडे ,नितीन शिंदे, गोपाल झाडे, वर्षा देवसरकर, बळीराम मुटकुळे ,गजेंद्र ठाकरे यांना पोलीसांनी ताब्यात घेऊन सोडण्यात आले
मराठा आंदोलक सचिन घाडगे यांनी जो पर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत उमरखेड येथे कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी असल्याची भूमिका स्पष्ट केली . २४ तारखेपर्यंत आरक्षण न मिळाल्यास मिळालेल्या निर्देशानुसार पुढील आंदोलन करण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले .