

पुढारी ऑनलाईन डेस्क : महिला प्रीमियर लीग २०२४ साठी (WPL auction 2024 ) आज (दि.९) मुंबईत खेळाडूंचा लिलाव होत आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंपाठोपाठ भारतीय खेळाडूंवर मोठी बोली लागली आहे. काशवी गौतमवर २ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली आहे. गुजरात जायंट्सने तिचा संघात समावेश केला आहे. बेस प्राईज १० लाख असणार्या काशवीवर दाेन काेटींची बाेलीला खरेदी झाली. आजची सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे. आजच्या लिलावात भारताची अनकॅप्ड खेळाडू वृंदा दिनेश हिनेही सर्वांना चकित केले. तिला यूपी वॉरियर्सने १ कोटी ३० लाख रुपयांना विकत घेतले. तिची बेस प्राइस १० लाख होती. बेस प्राइस १० लाख असताना वृंदाला १३ पटीने अधिक बोली मिळाली.
काशवी गौतम ही मूळची पंजाबमधील चंदीगडची राहिवासी आहे. वेगवान गोलंदाजीसाठी ओळखली जाते. काशवीने महिला क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहेत. महिलांच्या देशांतर्गत अंडर 19 स्पर्धेत तिने चंदीगडसाठी अरुणाचल प्रदेश विरुद्ध एकदिवसीय सामन्यात हॅट्ट्रिक घेतली होती.
भारताची अनकॅप्ड फलंदाज त्रिशा पुजिथा हिला गुजरात जायंट्सने तिची बेस प्राइस १० लाख रुपयांना खरेदी केले. दरम्यान, सुरुवातीच्या लिलावात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना वर्चस्व राखले. ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू एनाबेल सदरलँड हिला दिल्ली कॅपिटल्सने २ कोटी रुपयांना खरेदी केले. तिची बेस प्राइस ४० लाख रुपये होती. सदरलँडला घेण्यासाठी दिल्ली आणि मुंबई यांच्यात चुरस दिसून आली. अखेर दिल्लीने बाजी मारत तिच्यासाठी २ कोटी रुपये मोजले. लिलावकर्ता म्हणून मल्लिका सागर काम पाहात आहेत.
ऑस्ट्रेलियाची फलंदाज फोबी लिचफिल्ड हिला गुजरातने १ कोटी रुपये मोजून आपल्या संघात घेतले. फोबी लिचफील्ड ही २०२४ च्या लिलावात बोली लागलेली पहिली खेळाडू आहे. ही ऑस्ट्रेलियन फलंदाज आहे. तिची बेस प्राइस ३० लाख रुपये होती आणि तिला गुजरात जायंट्सने १ कोटी रुपयांना विकत घेतले. इंग्लंडची फलंदाज डेनी वायट हिला यूपी वॉरियर्सने बेस प्राइस ३० लाखांमध्ये खरेदी केले.भारतीय खेळाडू भारती फुलमली आणि मोना मेशराम यांच्यावर कोणीही बोली लावली नाही. त्याचबरोबर भारताची वेदा कृष्णमूर्ती, पूनम राउत, प्रिया पूनिया देखील अनसोल्ड राहिली. देविका वैद्य हिलादेखील कोणी बोली लावली नाही.