

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : रिलायन्स लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या पॉलिसीची रक्कम परत करण्याचे आमिष दाखवून जिल्हा न्यायालयाच्या निवृत्त अधीक्षकांची अज्ञात सायबर ठगाने ४३ लाखांची फसवणूक केली. मार्च २०१७ ते एप्रिल २०२३ या कालावधीतील हा प्रकार आहे. लाखो रुपये गमावल्यानंतर सेवानिवृत्त अधीक्षकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी ४ नोव्हेंबर रोजी भंडारा येथील सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सन २०१७ मध्ये एका अज्ञात व्यक्तीने जिल्हा न्यायालयाचे निवृत्त अधीक्षक गणेश काशीराम घोरमोडे (वय ६०, रा. बाबानगर भंडारा) यांना फोन करून रिलायन्स विमा कंपनीच्या तक्रार निवारण विभागातून बोलत असल्याचे सांगत मुंबई कार्यालयाशी बोलून पॉलिसीची १ कोटी १५ लाखांची रक्कम परत करण्याचे आमिष दिले. रक्कम परत करण्याच्या बहाण्याने सायबर ठगाने गणेश घोरमोडे यांच्याकडे विविध कारणांनी पैशांची मागणी सुरू केली. घोरमोडे त्याला बळी पडले. त्यांनी एनईएफटी, आरटीजीएस, चेक, ऑनलाइन, रोख देण्यास सुरुवात केली. २०१७ ते २०२३ या कालावधीत त्यांनी ४३ लाख २५ हजार ६२ रुपये भरल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे गणेश घोरमोडे यांच्या लक्षात आल्याने शनिवारी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी अज्ञात सायबर ठगावर गुन्हा दाखल केला आहे.