जालना : आरक्षणाचा शासन आदेश हाच माझ्यासाठी उपचार; मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावली | पुढारी

जालना : आरक्षणाचा शासन आदेश हाच माझ्यासाठी उपचार; मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावली

वडीगोद्री; पुढारी वृत्तसेवा मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या पाचव्या दिवशी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे. असे असताना मराठ्यांना आरक्षणाचा निर्णय होत नाही. तो पर्यंत पाण्याचा घोटच काय, आरोग्य तपासणी, उपचार व सलाईन ही घेण्यास जरांगे यांनी नकार दिला आहे. आरक्षणाचा शासन आदेश हाच माझ्यासाठी उपचार असेल अशी त्यांची भूमिका आहे. तसा निर्णय आल्याशिवाय माघार घ्यायची नाही. पाण्याचा घोट ही घ्यायचा नाही अशी भीष्म प्रतिज्ञाच मनोज जरांगे यांनी घेतलेली आहे.

मनोज जरांगे यांनी पाच दिवसांपासून पाणी सुधा प्यायले नाहीत. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होऊन डिहायड्रेशन वाढणे, रक्तदाब कमी होणे, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होणे यासह किडणी, लिव्हर आणि हृदय यावरही परिणाम होतो असे तज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे जरांगे पाटलांनी किमान पाणी तरी प्यावे अशी प्रत्येक मराठा बांधव त्यांना विनंती करत आहेत. मात्र ते आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने सर्वांना त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता वाटू लागली आहे.

सरकार आश्वासन देते, त्यांना एक महिन्याची वेळ दिली. तरी आश्वासनाचा विसर सरकारला वारंवार पडतो. त्यामुळे आता ठोस शासन निर्णय होईपर्यंत पाण्याचा घोटही नाही अशी भूमिका त्‍यांनी घेतली आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शिंदे समितीला दोन महिन्यांची मुदतवाढ सरकारने दिली. समितीचा अहवाल आल्यावर आरक्षणाचा निर्णय होईल. समितीला मुदतवाढ देण्यासाठी उपोषणकर्ते तयार नाहीत. त्यामुळे आता तोडगा निघेल की नाही? उपोषणकर्ते जरांगे हे पाच दिवसांपासून पाण्याचा घोट ही घेण्यास तयार नाहीत. त्यांच्या प्रकृतीवर त्याचा परिणाम नक्किच होणार. रक्तदाब कमी होणे साखरेचे प्रमाण घटू शकते. त्यामुळे आता सरकार आंदोलन रेटून देण्याचा प्रयत्न करते की यावर तोडगा काढते हे बघणं महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्य तपासणीला जरांगे-पाटलांचा पुन्हा विरोध

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे.आज मनोज जरांगे यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी डॉक्टरांचे पथक आले होते. यावेळी तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांना तपासणी करण्यासाठी मनोज जरांगे यांनी नकार दिला. त्यांनतर डॉक्टरांना आल्या पाऊली परत जावे लागले.

Back to top button