धुळ्यात राजकीय मेळावे, बैठकांना बंदी; मराठा आंदोलनाचा मंत्री दादा भुसे यांच्यासह नाना पटोलेंना फटका

धुळ्यात राजकीय मेळावे, बैठकांना बंदी; मराठा आंदोलनाचा मंत्री दादा भुसे यांच्यासह नाना पटोलेंना फटका

धुळे; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मंत्री आणि पुढाऱ्यांना जिल्हा बंदी करण्याचा निर्णय धुळ्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला. याचा फटका आज राज्याचे मंत्री दादा भुसे यांना देखील बसला. धुळ्यात आज होणारी बैठक मंत्री भुसे यांना रद्द करावी लागली. तर उद्या रविवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणारा शेतकरी मेळावा देखील काँग्रेसने रद्द केला आहे. मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हा मेळावा रद्द करण्यात आल्याची माहिती आमदार कुणाल पाटील यांनी दिली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे ,या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धुळ्यात जेल रोडवर सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणा अंतर्गतच आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत धुळे जिल्ह्यात मंत्री आणि पुढाऱ्यांना प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण आज राज्याचे मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही माहिती आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना मिळाल्याने त्यांनी ही बैठक हाणून पाडण्याचा निर्णय आंदोलन स्थळी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

यावेळी या बैठकीत मराठा आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारचे प्रतिनिधी असणाऱ्या मंत्री भुसे यांच्यासमोर निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार संबंधित हॉटेलच्या बाहेर मंत्री भुसे यांना काळे झेंडे दाखवण्याची तयारी देखील करण्यात आली. मात्र मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत होणारी ही बैठक ऐनवेळी रद्द करण्यात आली.

मराठा आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी काँग्रेसचा मेळावा रद्द : आमदार कुणाल पाटील

दरम्यान रविवारी (दि. २८) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळ्यात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र आमदार कुणाल पाटील यांनी मराठा समाजाच्या वेगवेगळ्या आंदोलनात प्रत्येक वेळी भाग घेतला आहे. धुळे ग्रामीण परिसर तसेच शहरी परिसरात देखील मोठ्या प्रमाणावर मराठा बांधव हे आरक्षणासाठी आंदोलन आणि निदर्शने करीत असताना मेळावा घेणे योग्य होणार नाही. त्यामुळे या मेळाव्याच्या ठिकाणावर आंदोलन करण्याचा निर्णय धुळ्यातील आंदोलक सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला. मात्र मराठा समाजाच्या या आंदोलनाची दखल घेत शेतकरी मेळावा देखील रद्द करण्यात आल्याची माहिती आमदार कुणाल पाटील यांच्या वतीने देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news