”जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत माझ्या शरीराला जाळू नका”: शेवटचा निरोप देत मराठा तरुणाने संपवले जीवन | पुढारी

''जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत माझ्या शरीराला जाळू नका'': शेवटचा निरोप देत मराठा तरुणाने संपवले जीवन

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जय जिजाऊ-जय शिवराय, जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माझ्या शरीराला जाळू नका.. एक मराठा, लाख मराठा, असा मजकूर डिजीटल बोर्डवर लिहून एका तरुणाने जीवन संपवले. बीड रोडवरील आपतगावात (जि. छत्रपती संभाजीनगर) गुरुवारी (दि. २६) ही घटना घडली. मराठा आरक्षणासाठी तरुणांनी बलिदान देण्याच्या घटना काही दिवसांत वाढल्या असून राज्यातील बळींचा आकडा आता पन्नासहून अधिक झाला आहे.

गणेश काकासाहेब कुबेर (२८, रा. आपतगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, बहीण, असा परिवार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांनी दिली. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरु झाले आहे. दरम्यान, १९ ऑक्टोबरला शहरातील मुकुंदवाडी भागातील राजनगरात सुनिल बाबुराव कावळे (४२) यांनी जीवन संपवल्याची घटना ताजी आहे. त्यांचा दशक्रिया विधीही झालेला नाही तोच आपतगावात गणेश कुबेर याने मराठा आरक्षणासाठी जीवन संपविल्याची घटना समोर आली. गणेश हा गरिब शेतकरी कुटुंबातील तरुण होता. त्याला दोन भाऊ, एक बहीण आहे. अवघी ३ एकर शेती आहे. आर्थिक परिस्थिती नाजूक आहे.

गुरुवारी (दि. २६) सकाळी नेहमीप्रमाणे त्याने पत्नीसह अन्य कुटुंबियांना दुचाकीने शेतात नेऊन सोडले. तेथून तो घरी परत आला. त्यानंतर डिजीटल बोर्डवर डिजीटल बोर्डवर मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय माझ्या शरीराला जाळू नका, असा मजकूर लिहून त्याने घरातच जीवन संपवले. या प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आपतगावात फौजफाटा तैनात

गुरुवारी दुपारी ३ वाजता चिकलठाणा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा गावात मराठा समाजबांधव आक्रमक झाले. मराठा आरक्षणासह अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर कारवाई करा, गणेश कुबेरच्या कुटुंबियांना शासकीय मदत जाहीर करा, नोकरीत समाविष्ट करा, यासारख्या मागण्या करीत समाजबांधवांनी घोषणाबाजी केली. परिस्थिती पाहून खांडेकर यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांना माहिती दिली. त्यानंतर गावात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. उपविभागीय अधिकारी रामेश्वर कदम, तहसीलदार रमेश मुनलोड यांनीही आपतगावात धाव घेतली.

७ वाजेपर्यंत मृतदेहाला हातही लावला नाही

या आत्महत्या प्रकरणामुळे गावात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. तरुण आक्रमक झाले आहेत. मागण्या मान्य झाल्याशिवाय मृतदेहाला हात न लावू देण्याची भूमिका सर्वांनी घेतली. त्यामुळे दुपारी ३ वाजता घटना उघडकीस येऊनही संध्याकाळी ७ वाजेपर्यंत कोणीही मृतदेहाला हात लावला नव्हता. प्रशासनालाही मृतदेह हलवू दिला नाही, अशी माहिती गावातील तरुणांनी दिली.

Back to top button