सिंधुदुर्ग : तिलारी आंतरराज्‍य धरण प्रकल्‍पातील पाणी साठ्यात वाढ

तिलारी धरण
तिलारी धरण

दोडामार्ग; पुढारी वृत्तसेवा दोडामार्ग तालुक्यात मुसळाधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे तिलारी आंतरराज्य धरण प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरणाची पाणी पातळी १११.५५ मी. इतकी म्हणजेच ९४.२८ टक्के झाल्याने धरणातील अतिरिक्त पाणी २ ऑक्टोबर रोजी खळग्यातील दगडी धरणाच्या सांडव्यावरून पुच्छ कालव्याद्वारे तिलारी नदीत सोडण्यात येणार आहे. त्यामुळे या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा तिलारी पाटबंधारे प्रकल्पच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.

दोडामार्ग तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. परिणामी सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील मुख्य व मोठे असलेल्या तिलारी धरणातील पाणी पातळीत कमालीची वाढ होत आहे. मुसळधार पावसामुळे धरणाच्या सभोवताली असलेल्या डोंगरातून मोठ्या प्रमाणात पाणी धरणात जमा होते. मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळाधार पावसामुळे धरणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

तिलारी धरणाची पूर्ण जलसंचय पाणी पातळी ११३.२० मी आहे. तर धरणाची सांडवा माथा पातळी १०६.७० मीटर झाल्यास पाण्याचा विसर्ग केला जातो. रविवारी सकाळपर्यंत धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊन ११३.५५ मी. झाली आहे. म्हणजेच सध्या धरण ९४.२८ टक्के भरले असल्याने व पाऊस कोसळत असल्याने पाण्याचा विसर्ग करणे गरजेचे आहे. त्यामुळे सोमवारपासून या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. हा विसर्ग खळग्यातील दगडी धरणाच्या सांडव्यावरून पुच्छ कालव्याद्वारे तिलारी नदीला सोडण्यात येणार आहे. खराडी नदीचे पाणी व धरणाचे पाणी तिलारी नदीला मिळत असल्याने या नदीपात्रातील पाण्यात कमालीची वाढ होणार आहे.

त्यामुळे नदीकाठच्या असलेल्या कोनाळकट्टा, घोटगेवाडी, परमे, घोटगे, आवाडे, मणेरी, कुडासे, साटेली-भेडशी या गावांसहीत गोवा राज्यातील पेडणे तालुक्यातील इब्रामपूर-हणखणे, चांदेल, हसापूर, कासरवर्णे, वारखंड गावातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी नदीपात्रातून ये-जा करू नये. कपडे धुण्यासाठी नदीपात्रात उतरू नये. पाळीव गुरांना नदीपात्रात सोडू नये. तसेच गावांत दवंडी पिटवून सतर्क राहण्याचे आवाहन तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

तिलारी धरणातील पाण्याचा विसर्ग खळग्यातील दगडी धरणातून केला जातो. १ जून रोजी धरणाचे चारही वक्राकार दरवाजे उघडले जातात. धरणाची सांडवा माथा पाणी पातळी १०६.७० मी. असल्याने यापेक्षा अधिकचे पाण्याचा विसर्ग सुरू होतो. ३१ जुलै रोजी धरणाचे दरवाजे बंद केले जातात. १० ऑगस्टपर्यंत पाणी पातळी १०९.७० मी.पर्यंत वाढवतात व गरजेनुसार द्वारांची उघडझाप केली जाते. पावसाळ्याच्या उत्तरार्धात २० ऑगस्टपर्यंत पाणी पातळी ११२.२० मी.पर्यंत वाढवली जाते. मात्र मागील पाच दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने व हवामान खात्यानेही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवल्याने धरणाचे बंद केलेले दरवाजे सोमवारपासून उघडण्यात येणार आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news