अंतरवाली सराटीत साखळी उपोषण | पुढारी

अंतरवाली सराटीत साखळी उपोषण

वडीगोद्री (जालना) : पुढारी वृत्तसेवा अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेले मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण गुरुवारी सुटले असले, तरी त्यांनी घोषित केल्याप्रमाणे शुक्रवारी साखळी उपोषण आंदोलनास सुरुवात झाली. साखळी उपोषणाच्या पहिल्या दिवशी अंतरवाली सराटी गावचे ग्रामस्थ आंदोलनास बसले आहेत. या आंदोलनात यापुढे जालना आणि बीड जिल्ह्यातील रोज एका गावातील ग्रामस्थ सहभागी होणार आहेत. जरांगे यांनी सरकारला 40 दिवसांचा वेळ दिल्याने 40 दिवस अथवा संबंधित जीआर निघत नाही, तोपर्यंत साखळी उपोषणाचे नियोजन करण्यात आले आहे.

उपोषणस्थळी दुपारी शिव व्याख्यान होणार असून, त्यानंतर अनेक मराठा आरक्षण अभ्यासक व कायदेतज्ज्ञ यांचे मार्गदर्शन, व्याख्यान होणार आहेत. तसेच रोज रात्री हरी कीर्तनाचे ही नियोजन केले जात आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार, शहिरांचे पोवाडे व संगीत भजन, भारूड कीर्तनाचा कार्यक्रम संपूर्ण 40 दिवस याठिकाणी होणार आहे. शुक्रवारी काही गावांतून लोक उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आले होते.

मराठा आरक्षण मागणीसाठी पायी दिंडी आंदोलन

पैठण : मराठा आरक्षण मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी (दि. 15) सकाळी पायी दिंडी आंदोलनाला प्रारंभ झाला. पैठण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या परिसरातून दिंडीला सुरुवात झाली. मराठा आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पैठण ते छत्रपती संभाजीनगर 50 किलोमीटर आरक्षण पायी दिंडी आयोजित करण्यात आली.

Back to top button