टोरांटो ; पुढारी वृत्तसेवा भारतीय अध्यात्मशास्त्र हे मनाचा शास्त्रीय द़ृष्टिकोनातून अभ्यास करून ते शांत करण्याचा उपाय सांगणारे आहे. एखाद्या निर्वात ठिकाणी असलेल्या दिव्याची ज्योत जशी शांत तेवत राहते तसे शांत मन केवळ अध्यात्मासाठीच नव्हे तर व्यावहारिक जीवनासाठीही उपयुक्त ठरते. मात्र, व्यावहारिक जीवनात मन शांत नसते आणि त्यामध्ये सतत समुद्राच्या लाटांप्रमाणे विचारांच्या लाटा येत असतात. कॅनडाच्या क्विन्स युनिव्हर्सिटीच्या एका शोधानुसार रोज एखाद्या व्यक्तीच्या मनात सहा हजार विचार येतात. नॅशनल सायन्स फाऊंडेशनच्या विश्लेषणानुसार यापैकी 80 टक्के विचार हे नकारात्मक असतात. त्यामुळे किमान चार मिनिटांचे ध्यानही गरजेचे आहे!
विचारांच्या उपद्रवामुळे दैनंदिन जीवनातील कामांवरही दुष्परिणाम होत असतात. त्यावर उपाय म्हणजे मन शांत करणे आणि त्यामध्ये सकारात्मक विचारांची पेरणी करणे. रोज केवळ चार मिनिटांचे ध्यानही यासाठी उपयुक्त ठरू शकते असे तज्ज्ञांना वाटते. व्यावहारिक जीवन जगत असताना कोणतीही प्रतिक्रिया देत असताना ती विचारपूर्वक देणेही गरजेचे ठरते. त्यामुळे मेंदूतील विचारांची गर्दी कमी होते व आपले उत्तर नेमकेपणाने व्यक्त होते. घर, अंगणाची जशी साफसफाई होते तसे आपल्या मनातील जुनाट, त्रासदायक, नकारात्मक विचारही झटकून देण्याची सवय लावून घेणे गरजेचे आहे. असा कचरा मनातून बाहेर काढून आनंददायी, आशादायक व सकारात्मक विचारांची नव्याने पेरणी झाली तर जीवन अधिक चांगले बनू शकते. त्याचा लाभ मानसिक आणि शारीरिक आरोग्यालाही होत असतो.