Solapur Accident News: शिरवळवाडीजवळ भीषण अपघातात ५ भाविकांसह मुलगा ठार; १० जण जखमी

Solapur Accident News: शिरवळवाडीजवळ भीषण अपघातात ५ भाविकांसह मुलगा ठार; १० जण जखमी
Published on: 
Updated on: 

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : अक्‍कलकोट तालुक्यातील शिरवळवाडीजवळ ट्रक आणि ट्रक्स क्रूझरचा  भीषण अपघात (Solapur Accident News) झाला. या अपघातात क्रूझरमधील ६ जण जागीच ठार झाले. तर १० जण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी (दि.३०) सायंकाळी साडेचारच्या सुमारास झाला. मृत व जखमींना अक्‍कलकोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले आहे. क्रूझरमधील सर्वजण अणूर (ता.आळंद, जि.कलबुर्गी) येथून नवस फेडण्याकरिता कर्नाटकातील अफझलपूर येथील भागम्मा देवी येथे गेले होते. नवस फेडून गाणगापूर, अक्कलकोट येथे देवदर्शन करुन वागदरी मार्गे अणूरकडे जात होते.

यावेळी ट्रक (एमएच 12 यूएम 7186)  गुलबर्गा येथून वागदरीमार्गे अक्‍कलकोटकडे येत होता. तर क्रूझर जीप (केए 35 ए 7495) अक्‍कलकोटकडून गुलबर्गाकडे जात होती. क्रूझरमधील सर्वजण हे देवदर्शन करून कर्नाटकातील अणूर या गावाकडे जात असताना शिरवळवाडी गावाजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात क्रूझर जीपमधील ६ जण ठार झाले. तर १० जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्यासह शिरवळवाडी गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.  अपघातातील मृत व जखमींना उपचारासाठी तत्काळ अक्‍कलकोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले (Solapur Accident News) आहे.

यातील जखमींची नावे अशी : क्रुझरचे चालक सुनिल हणमंतराव पांचाळ (वय 50), सुमित पुजारी (वय 9), रेखा गोविंद पुजारी (वय 40), गोपाल चंद्रकांत पुजारी (वय 50), विठ्ठल हणमंत ननवरे (वय 35), अजित अशोक कुंदले (वय 30), भाग्येश अशोक कुंदले (वय 40), अशोक पुनदिले (वय 45), कोमल शामडे (वय 50), कल्पना अशोक कुंदले (वय 40 सर्व रा. अणूर, ता.आळंद, जि.कलबुर्गी)

मृतांमध्ये ५ महिला, तर  एक १२ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. कंटेनर चालक अपघातानंतर फरार झालेला आहे. याबाबत अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते. या घटनास्थळी ग्रामीण पोलीस अधीक्षक, अक्कलकोट उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, उत्तर पोलीस ठाण्याचे पो.नि.जितेंद्र कोळी, तहसिलदार बाळासाहेब शिरसाठ घटनास्थळी दाखल झाले होते.

या अपघातातील मृतदेह शवविच्छेदनासाठी अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. सदरील अपघात घडल्यानंतर रिपाइं तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे, राजु भगळे, सोहेल बागवान, दिलीप सिध्दे, प्रभाकर पाटील, समीर शेख, श्रीशैल इसामंत्री, सुरेश गायकवाड, शिलामणी बनसोडे, दिनेश रुही, शुभम मडिखांबे, शिवा जमगे, गणेश कांदे, लादेन बागवान, नन्हु कोरबु, संजय राठोड, अंबादास गायकवाड आदींनी अपघातातील जखमींना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात आणून प्राथमिक उपचार करुन सोलापूरकडे नेण्यासाठी मदत केली.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news