Air India : मैत्रिणीला कॉकपिटमध्ये बसविणे भोवले : एअर इंडियाच्या दोन वैमानिकांवर कारवाई | पुढारी

Air India : मैत्रिणीला कॉकपिटमध्ये बसविणे भोवले : एअर इंडियाच्या दोन वैमानिकांवर कारवाई

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : नियम धाब्यावर बसवून मैत्रिणीला विमानाच्या कॉकपिटमध्ये नेणाऱ्या दोन वैमानिकांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. गत आठवड्यात दिल्लीवरून लेहच्या दिशेने उड्डाण केलेल्या एअर इंडियाच्या (Air India) विमानात हा प्रकार घडला होता. तूर्त या दोन्ही वैमानिकांना ‘ऑफ रोस्टर’ करण्यात आल्याचे कळते. एआय-४४५ विमानात हा प्रकार घडला होता.

केबिन क्रु च्या तक्रारीनंतर यासंदर्भात एअर इंडिया (Air India) व्यवस्थापनाने वैमानिक आणि सह वैमानिकावर कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन करीत मैत्रिणीला संबंधितांने कॉकपिटमध्ये प्रवेश दिल्याचा ठपका ठेवत दोन्ही वैमानिकांना एअर इंडियाच्या ग्राउंड तसेच ऑफ रोस्टर करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

नागरी उड्डान महासंचालनालयाने (डीजीसीए) याप्रकरणी आवश्यक कारवाई केले जाईल, असे स्पष्ट केले आहे.एअर इंडियाकडून याप्रकरणी विस्तृत तपासासाठी एक समिती नेमणूक केली असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

लेह विमान मार्ग सुरक्षेच्या अनुषंगाने देशातील सर्वाधिक कठीण आणि संवेदनशील हवाई मार्गांपैकी एक आहे.शिवाय एका वाणिज्यिक विमानात कुठल्याही अनाधिकृत व्यक्तीला कॉकपिटमध्ये परवानगी देणे कायद्याचे उल्लंघन आहे.डीजीसीए ने नुकतेच एअर इंडियाच्या एका वैमानिकांचा परवाना निलंबित केला होता.२७ फेब्रुवारीला दुबईवरून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या एआय -९१५ च्या कॉकपिटमध्ये संबंधित वैज्ञानिक मैत्रिणीला घेवून गेला होता.यानंतर कारवाई करीत डीजीसीएने एअरलाईनवर ३० लाखांचा दंड ही ठोठावला होता.कारवाई नंतर देखील असा प्रकार पुन्हा घडल्याने आश्यर्य व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा 

Back to top button