पुढारी ऑनलाइन डेस्क : NEET Exam : मेडिकलसाठी घेण्यात येणारी नीटची प्रवेश परीक्षा 7 मे 2023 रोजी पार पडली. यावेळी एका विद्यार्थिनीसोबत घडलेल्या अनपेक्षित प्रकारामुळे तिचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न हुकले. इतकेच नव्हे वर्ष वाया जाणार हे दिसत असल्याने ही विद्यार्थिनी गेल्या एक महिन्यापासून डिप्रेशनमध्ये आहे. तिच्या आई-वडिलांनी न्यायालयात न्यायासाठी धाव घेतली आहे. हे सर्व घडलं ते पर्यवेक्षकाला चहा पिण्याची तलप न आवरता आल्याने…. अमर उजालाने या घटनेचे वृत्त दिले आहे. वाचा सविस्तर घटना
जयपूरच्या बस्सी भागात राहणाऱ्या दिशा शर्मा हीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आहे. ती दहावी आणि बारावीत टॉपर राहिलेली विद्यार्थिनी आहे. मेडिकलला प्रवेश मिळवण्यासाठी 7 मे रोजी Neet ची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी तिने दिवस रात्र तयारी केली होती. उत्तम तयारी करून परीक्षेच्या दिवशी ती परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर पोहोचली. सर्व काही व्यवस्थित सुरू होते. दोन वाजता परीक्षा सुरू झाली. दिशा ओएमआर शीटवर पेपर सोडवत होती. जवळपास दीड तास झाला. आणि अचानक तिच्या हातावर तसेच ती लिहीत असलेल्या ओएमआर शीट आणि टेबलवर चहा सांडला. ती क्षणभर गोंधळली.
गोंधळलेल्या नजरेने तिने वर पाहिले. पर्यवेक्षणासाठी आलेल्या पर्यवेक्षकाच्या हातून चहाचा कप निसटला होता. तो तिच्या उत्तरत्रिका हात आणि टेबलवर सांडला होता. पर्यवेक्षणासाठी आलेले पर्यवेक्षक रांगेत फिरता-फिरता चहाचा आनंद घेत होते. त्यावेळी त्यांच्या हातून तो चहाचा कप निसटला.
गोंधळलेल्या दिशाने आपल्या मास्कने हळू-हळू आपले ओएमआर शीट स्वच्छ केले. मात्र, यामुळे तिच्या ओएमआर शीटवरील काही उत्तरं मिटली. तसेच ते खराबही झाले. थोड्यावेळात ते पर्यवेक्षक एक कपडा घेऊन आले त्यांनी दिशाला या कपड्याने ओएमआर शीट आणि टेबल पुसून घ्यायला सांगितला. दरम्यान या सगळ्यात दिशाचे जवळपास 15 ते 20 मिनिटे वाया गेले. तरीही पर्यवेक्षकाने म्हटले के जास्त खराब झाले नाही तू पेपर कम्प्लीट करून घे, असे सांगितले.
दिशाने पर्यवेक्षकांना आपला वेळ वाया गेला आहे त्यासाठी अतिरिक्त वेळ द्या. त्यावेळी पर्यवेक्षकांनी ठीक आहे म्हटले. मात्र, प्रत्यक्षात तिला पाच मिनिटे देखील अतिरिक्त वेळ न देता तिचे ओएमआर शीट हिसकावण्यात आले. दिशाचे 17 प्रश्न अपूर्ण राहिले. तिचा केमिस्ट्रीचा पेपर 33 टक्के सोडवायचा बाकी राहिला.
दिशाने याची प्राचार्यांकडे तक्रार केली. मात्र, प्राचार्यांनी तिला अर्धा तास बसवून ठेवले. जेणेकरून सर्व विद्यार्थी निघून जातील आणि गोंधळ होणार नाही. तसेच ही घटना फार कोणाला कळणार नाही. तसेच प्राचार्यांनी तिला हे प्रकरण अधिक वाढवू नकोस तुझे ओएमआर शीट खराब झालेले नाही. तरी आम्ही तुला खर्च देऊन टाकू.
आपली मुलगी अजून कशी आली नाही म्हणून पालक चिंतेत होते. दिशा जेव्हा रडत-रडत बाहेर आली तिने आई राजेश्वरीला घडलेली घटना सांगितली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे याची तक्रार दिली. पोलिस आल्यानंतरही त्यांना योग्य वागणूक मिळाली नाही. दिशाच्या वडिलांना प्राचार्यांच्या केबिनमध्ये जाऊ दिले नाही. फक्त दिशाची आई आणि दिशाला मोबाईलशिवाय आतमध्ये पाठवले. तिथे त्यांनी तिच्या आईला लांबून ओएमआर शीट दाखवली. तसेच तिला वर्षभराची नुकसान भरपाई देऊ असे म्हटले. दिशाच्या आईने प्राचार्यांना हे लिखित स्वरुपात मागितले. मात्र, प्राचार्यांनी ते देण्यासाठी नकार दिला. त्यामुळे ते रामनगरिया पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन गेले. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
दरम्यान या घटनेमुळे दिशाचे मानसिक आरोग्य बिघडले. तिला डॉक्टरांना दाखवावे लागले. तसेच तीला झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागल्या. दिशाच्या आईने सांगितल्या प्रमाणे दिशा हुशार मुलगी आहे. दहावी बारावीला तिने शाळेत सायन्समध्ये 100 पैकी 100 गुण मिळवले आहे. NEET च्या परीक्षेसाठी तिने रात्रंदिवस अभ्यास करून तयारी केली होती. आता तिची चूक नसतानाही तिचे वर्ष वाया जाणार या दुःखाने ती निराश झाली असून तिचे मानसिक आरोग्य बिघडले आहे.
दिशा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अखेर अॅडव्होकेट अधिवक्ता रघुनंदन शर्मा यांच्या मदतीने हायकोर्टात धाव घेतली. हे संपूर्ण प्रकरण अतिशय गांभीर्याने घेत न्यायमूर्ती एमएम श्रीवास्तव आणि न्यायमूर्ती अनिल उपमन यांच्या खंडपीठाने दिशाचे मूळ ओएमआर शीट आणि एनटीएकडून संपूर्ण रेकॉर्ड मागवले आहे. परीक्षा केंद्रापासून ते वर्ग खोलीपर्यंतच्या सीसीटीव्ही फुटेजसह शाळेच्या मुख्याध्यापकांना ४ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या घटनेसंबंधी विवेक टेक्नो स्कूलच्या प्राचार्या इंदिरा सिंग यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
हे ही वाचा :