BrahMos Missile: पाकिस्तानात चुकून डागलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रामुळे भारताचे २४ कोटींचे नुकसान | पुढारी

BrahMos Missile: पाकिस्तानात चुकून डागलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रामुळे भारताचे २४ कोटींचे नुकसान

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: मागील वर्षी मार्चमध्ये पाकिस्तानच्या दिशेने चुकून ब्रह्मोस क्षेपणास्त्र  (BrahMos Missile) डागल्यामुळे हवाई दलातील अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले होते. केंद्र सरकारने अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय योग्य ठरवला आहे. दिल्ली उच्च न्यायालयात विंग कमांडर अभिनव शर्मा यांच्या याचिकेला विरोध करताना केंद्र सरकारने सांगितले की, अधिकाऱ्यांच्या या चुकीमुळे भारताचे शेजारी देशासोबतचे संबंध तर बिघडलेच, शिवाय देशाचे २४ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

विंग कमांडर अभिनव शर्मा यांनी आपल्या बडतर्फीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या विरोधात केंद्र सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करताना या प्रकरणाची संवेदनशीलता पाहिली पाहिजे,असे म्हटले आहे. तसेच  क्षेपणास्त्र (BrahMos Missile)  डागण्यासंदर्भातील व्यावहारिक तपशील जाणून घेण्यात आंतरराष्ट्रीय समुदाय स्वारस्य दाखवत असल्याचेही नमूद केले आहे. या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन विंग कमांडरची सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्राने न्यायालयाला सांगितले. केंद्र सरकारने सांगितले की, या प्रकरणाचा देशाच्या सुरक्षेवर मोठा परिणाम होऊ शकतो, त्यामुळे २३ वर्षांनंतर भारतीय लष्करात असा निर्णय घ्यावा लागला.

दरम्यान, अभिनव शर्मा यांनी असा युक्तिवाद केला आहे की, त्यांना दिलेले व्यावसायिक आणि व्यावहारिक प्रशिक्षण केवळ क्षेपणास्त्राच्या देखभालीशी संबंधित होते, त्याच्या ऑपरेशनशी नाही. त्यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की त्यांनी कॉम्बॅट एसओपीच्या आधारे आपले कर्तव्य पूर्णपणे बजावले आहे. अभिनव शर्माच्या याचिकेवर केंद्राने न्यायालयाला असेही सांगितले की, कोर्ट ऑफ इन्क्वायरीच्या प्रक्रियेदरम्यान याचिकाकर्त्याला आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. त्याला बरीच सूटही देण्यात आली होती.

अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे भारतीय हवाई दल आणि देशाच्या प्रतिष्ठेला तर हानी पोहोचली आहेच, पण देशाच्या तिजोरीचेही नुकसान झाल्याचे सरकारने म्हटले आहे. अधिकारी त्यांच्या चुकांसाठी इतर अधिकार्‍यांवर खापर फोडत आहेत, हे चुकीचे असल्याचे केंद्राने म्हटले आहे.

हेही वाचा 

Back to top button