5 जी क्रांतीच्या दिशेने!

5 जी क्रांतीच्या दिशेने!
Published on
Updated on

विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगती सातत्याने सुरू असते. अखिल मानवजातीच्या उत्थान, गती-प्रगती आणि विकासाचे अंकुर त्यातून फुलत असतात. ती अभ्युदयाची आशा असते. प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर नवी ऊर्जा पुरवण्याचे काम ती करत असते. देशात 5 जी सेवा सुरू करण्यासंदर्भात केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या असून पुढच्या महिन्यात 5 जी ध्वनी लहरींच्या लिलावासाठी अर्ज मागवण्यात येणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची बातमी आल्याबरोबर देशभरात 5 जी चे ढोल वाजू लागले आहेत. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत ज्यांना त्यासंदर्भात काहीएक आकलन आहे, त्यांच्या पातळीवर चर्चेला उधाण आल्यामुळे सामान्य माणसांचेही कान टवकारले.

कारण, गेल्या काही वर्षांत दळणवळणाच्या क्षेत्रात जी क्रांती झाली, ती पाहिल्यानंतर पुढच्या टप्प्यात आणखी काय मिळणार, याबाबत सामान्यातल्या सामान्य माणसांना भलते कुतूहल आहे. ते असणे स्वाभाविकही आहे. कारण, 4 जी तंत्रज्ञान आल्यानंतर एकूण समाजामध्ये जे परिवर्तन दिसून येत आहे, ते नुसते थक्कच करणारे नव्हे, तर डोळे विस्फारायला लावणारे आहे. तंत्रज्ञानातील या प्रगतीमुळे माणसांना एवढे झपाटून टाकले की, अनेकदा दोन वेळच्या पोटाची भ्रांत असलेल्या माणसालासुद्धा पोटाच्या चिंतेपेक्षा मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे येणारी अस्वस्थता अधिक आहे. खेड्यापासून महानगरांपर्यंत आणि शेतमजुरापासून फेरीवाल्यांपर्यंत सर्वच घटकांवर या तंत्रज्ञानाने गारूड केलेे. त्याच्या बर्‍या-वाईट परिणामांची चर्चा केली जाऊ शकते; परंतु तंत्रज्ञानाने मानवी जीवनावर टाकलेला प्रभाव मान्यच करावा लागतो.

कोरोनाच्या काळात जगभरातील व्यवहार ठप्प झाले, त्यावेळी या तंत्रज्ञानाचे अनेक पातळ्यांवर हातभार लावला. शालेय स्तरापासून विद्यापीठीय पातळीपर्यंत ऑनलाईन व्यवस्थेमुळे काही प्रमाणात का होईना शिक्षण सुरू राहिले. वर्क फ्रॉम होमया नव्या संकल्पनेला याच काळात अधिष्ठान मिळाले. ओटीटी प्लॅटफॉर्म आणि वेबसीरिजची दुनिया आधीच खुली झाली असली, तरी तिची लोकप्रियता प्रचंड वाढली. मनोरंजनविश्वात नवे चैतन्य आले. अत्यंत प्रतिकूल अशा काळात मानवी जीवनातील चैतन्य आणि रसरशीतपणा टिकवून ठेवण्याचे काम तंत्रज्ञानामुळेच होऊ शकले. अर्थात, या तंत्रज्ञानाच्या कक्षेच्या बाहेर असलेला मोठा समूह आहे आणि त्याचे जगण्याचे प्रश्न वेगळे आहेत, याचे विस्मरण होऊन चालणार नाही. प्रगतीचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ काही प्रमाणात या घटकांपर्यंतही पोहोचला आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग माणसाचे जीवनमान उंचावण्यासाठी करावयाचा असतो; परंतु अनेकदा त्यावर स्वार होऊन सामाजिक अस्वास्थ्य निर्माण करण्याचे प्रयत्न केले जातात. त्याचा अनुभव देशाने अनेकदा घेतला. या सार्‍या पार्श्वभूमीवर 4 जी तंत्रज्ञानामुळे एका नव्या वळणावर आणून सोडले असतानाच 5 जीचे ढोल वाजू लागल्यामुळे त्याबाबत कुतूहल असणे स्वाभाविक आहे.

ध्वनी लहरींचा म्हणजे स्पेक्ट्रमचा विषय चर्चेत येतो तेव्हा तांत्रिक प्रगतीबरोबरच यासंदर्भाने भारतीय राजकारणात घडवलेल्या उलथापालथींचा विषयही समोर येतो. यूपीए सरकारच्या काळात टूजी, थ्रीजी स्पेक्ट्रमच्या संदर्भाने उठलेले वादळ आणि त्या वादळाने सरकारवर घातलेले घाव ही फार जुनी घटना नाही. परंतु, तो काळ आता मागे पडला आहे आणि त्या अनुभवातून शहाणे होऊन सरकारनेही व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणली आहे. अर्थात, तांत्रिक प्रगतीच्या या टप्प्यावरची आव्हाने ही वेगळी आहेत. दूरसंचार कंपन्यांमध्ये मक्तेदारीला चालना मिळाल्यामुळे अनेक कंपन्यांपुढे अस्तित्व टिकवण्याचे आव्हान आहे. 5 जीचा लिलाव अशा कंपन्यांसाठी संधी ठरणार की त्यांच्यापुढे नवी आव्हाने उभी राहणार, हाही एक प्रश्न आहेच. अर्थात, सर्वसामान्य माणसांना त्याचे देणेघेणे असण्याचे कारण नाही. कारण, एरव्ही फुकट दिल्यासारखा आव आणणार्‍या कंपन्या संधी मिळेल तेव्हा ग्राहकांना लुबाडण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे आपल्याला कोणते फायदे होणार आणि ते किती स्वस्तात मिळणार, याच्यातच सामान्य माणसांना रस आहे. 5 जीमुळे मोबाईल फोनमध्ये इंटरनेटच्या माध्यमातून दळणवळणात अत्यंत गतिमानता येईल.

इंटरनेटचा वेग वाढेल. 2 जी आणि 3 जी सेवा सुरू असतानाच्या परिस्थितीत मिळणार्‍या इंटरनेट सुविधेमध्ये 4 जी आल्यानंतर झालेले आमूलाग्र परिवर्तन आपल्यासमोर आहे. या काळात यू ट्यूबची निर्मिती आणि त्यांच्या दर्शकांमध्येही कोट्यवधींनी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. आता 5 जी नेटवर्कच्या साहाय्याने अल्ट्रा एचडी क्वालिटी व्हिडीओ कॉलिंग शक्य होणार आहे. वायरलेस इंटरनेटचा विस्तार वेगाने होऊ शकेल. सध्या एखादा चित्रपट डाऊनलोड करण्यासाठी खूप वेळ जातो, तेही काम काही सेकंदांमध्ये होऊ शकेल. याचा अर्थ सध्या जे मोबाईलचे व्यसन आहे, ते अनेक पटींनी वाढू शकेल. 4 जी आल्यानंतरच्या परिस्थितीतच मानवाच्या मूलभूत गरजांमध्ये अन्न-वस्त्र-निवारा-नेटवर्क असा उल्लेख केला जाऊ लागला आहे. गंमतीने केला जाणारा हा उल्लेख 5 जी आल्यानंतर गांभीर्याने केला गेला, तरी आश्चर्य वाटायला नको.

विद्युत उपकरणे, स्मार्ट टीव्ही अशा वस्तू इंटरनेटच्या सहाय्याने एकमेकांशी जोडणे अधिक सुलभ होईल. डिजिटल इंडियाचा जयघोष गेल्या काही वर्षांत सुरू आहे, त्या प्रक्रियेला गती मिळेल. केंद्र सरकारच्या विविध योजना थेट नागरिकांपर्यंत विनाविलंब पोहोचवता येतील. ब्रॉडबँड सेवेचे महत्त्वही अनन्यसाधारण वाढले आहे. स्वाभाविकपणे 5 जी तंत्रज्ञानाचा जलद बँकिंग सेवा, ऑनलाईन शिक्षण, ई-शिधावाटप प्रक्रिया, आरोग्य सेवा आदींमध्ये प्रभावी वापर करणे शक्य होईल. इंटरनेट ऑफ थिंग्ज, स्वयंचलित वाहने, स्मार्ट होम्स, स्मार्ट सिटी यासारख्या अभिनव कल्पना वास्तवात आणण्यासाठी या नवीन सेवेची भूमिका महत्त्वाची ठरेल. खर्‍या अर्थाने जग मुठीत आल्याचा अनुभव 5 जी सेवेमुळे मिळेलच, तो मिळवताना या सेवेच्या विघातक परिणामांची बाजूही समजून घ्यावी लागेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news