कोरोना विषाणूचा ‘अँटिबॉडी डेटाबेस’ विकसित | पुढारी

कोरोना विषाणूचा ‘अँटिबॉडी डेटाबेस’ विकसित

नवी दिल्ली ः शरीराच्या रोगप्रतिकारक क्षमतेच्या केंद्रभागी अँटिजन आणि अँटिबॉडी नावाचे दोन प्रमुख घटक असतात. बाह्य अँटिजन हे असे हानिकारक बाह्य पदार्थ आहेत जे शरीरात प्रवेश करून रोग उत्पन्न करतात. बाह्य हानिकारक पदार्थांपासून शरीराचे रक्षण करणार्‍या आंतरिक घटकांना ‘अँटिबॉडी’ असे म्हटले जाते. भारतीय संशोधकांनी आता कोरोना विषाणूला नियंत्रित करण्यास सक्षम असलेल्या अँटिबॉडीचे एक ऑनलाईन डेटाबेस विकसित केले आहे.

‘एबी-सीओव्ही’ नावाच्या या डेटाबेसमध्ये समाविष्ट अँटिबॉडी नमुने बाईंडिंग एफिनिटी आणि न्यूट्रलायझेशन प्रोफाईलसारख्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांनी युक्त आहे. अँटिबॉडी इंजिनिअरिंग आणि इम्यून एस्केप विश्लेषणात ‘एबी-सीओव्ही’ उपयोगी आहे जे कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटविरुद्ध चिकित्सिय रणनीती विकसित करण्यासाठी महत्त्वपूर्ण संसाधन होऊ शकते. ‘एबी-सीओव्ही’ डेटाबेसमध्ये आतापर्यंत ओळखण्यात आलेल्या कोव्हिड अँटिबॉडीबाबत विस्तृत माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये अँटिबॉडीचे स्रोत, व्हायरल प्रोटिन आणि विषाणूच्या रूपांसह अन्य बरीच माहिती आहे. ‘एबी-सीओव्ही’ हे सार्स-कोव्ह-2 या कोरोना विषाणूच्या नव्या रूपांविरुद्ध प्रभावी औषध विकसित करण्यासाठीही महत्त्वाची भूमिका बजावू शकते. आयआयटी मद्रासमधील संशोधकांनी हा डेटाबेस विकसित केला आहे.

Back to top button