मोठी बातमी : औरंगाबादच्या 'छत्रपती संभाजीनगर' नामांतरणाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली | पुढारी

मोठी बातमी : औरंगाबादच्या 'छत्रपती संभाजीनगर' नामांतरणाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

पुढारी ऑनलाइन डेस्क : राज्यात सध्या औरंगाबादचे नामांतरण ‘छत्रपती संभाजीनगर’ करण्यात आल्याचा मुद्दा गाजतोय. शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केल्याच्या सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. पंरतु, शुक्रवारी न्यायालयाने ही याचिका फेटाळली. सोमवारी (दि.27) मुंबई उच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी होणार असल्याने ही याचिका ऐकूण घेणार नाही, असे याचिका फेटाळाताना खंडपीठाने स्पष्ट केले. सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली न्या.पी.एस.नरसिम्हा आणि न्या.जे.बी.पारडीवाला यांचा समावेश असलेल्या खंडपीठासमक्ष याचिका सुचीबद्ध करण्यात आली होती.

औरंगाबाद शहराचे नाव बदलून ‘छत्रपती संभाजीनगर’ असे प्रस्ताविक करण्याच्या विभागीय आयुक्त,औरंगाबाद यांच्या ४ मार्च २०२० च्या पत्राला केंद्र तसेच राज्य सरकारने दिलेल्या मंजुरीला याचिकेतून आव्हान देण्यात आले होते. शुक्रवारी सुनावणी दरम्यान महाराष्ट्र सरकारच्या वतीने उपस्थित असलेले ज्येष्ठ अधिवक्ते बिरेंद्र सराफ यांनी या प्रकरणावार मुंबई उच्च न्यायालय २७ मार्च २०२३ ला सुनावणी घेणार आहे, असे खंडपीठाच्या लक्षात आणून दिल्यावर याचिका स्वीकारण्यास न्यायालयाने नकार दिला.

पंरतु, जेष्ठ वकील कपिल सिब्बल सोमवारी याप्रकरणात युक्तिवाद करतील असे वकील फुझैल अय्युबी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. पंरतु, यो प्रकरणावर उच्च न्यायालयात सुनावणी घेणार असल्याने उच्च न्यायालयात त्यांनी हजर राहावे असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट शब्दात सांगितले.

यापूर्वी देखील याचिकाकर्ते मोहम्मद मुश्ताक अहमद यांनी १९९६ मध्ये औरंगाबादच्या नामांतराच्या प्रयत्नाला आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळी परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे निर्देश दिले होते. पंरतु, केंद्र सरकारने न्यायालयाच्या निर्देशाकडे दुर्लक्ष करीत नामांतराच्या प्रक्रियेला मंजुरी दिली,असा दावा याचिकेतून करण्यात आला होता. दरम्यान न्यायालयाने याचिका फेटाळल्याने आता उच्च न्यायालयात काय सुनावणी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे वचलंत का?

Back to top button