22 दिवसांत 40 लाख परप्रांतीय मुंबईतून गावाकडे

22 दिवसांत 40 लाख परप्रांतीय मुंबईतून गावाकडे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : उन्हाळी सुट्टी, लग्नसराई आणि मतदानाकरिता उत्तर प्रदेश, बिहारला जाणार्‍या प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे. 1 ते 22 एप्रिल या 22 दिवसात मध्य रेल्वेने मुंबईतून रवाना केलेल्या तब्बल 900 मेल-एक्सप्रेसमधून 40 लाख परप्रांतीयांनी आपले गाव गाठले आहे. यात उत्तर प्रदेशला जाणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी आहे.

उन्हाळी हंगाम 10 एप्रिलपासून सुरू झाला आहे. लग्नाचे मुहूर्त सुरू झाले आहेत. त्यातच देशात सात टप्प्यांत लोकसभा निवडणुका होत आहेत. उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यात सर्वच टप्प्यात मतदान होणार आहे. या दोन्ही राज्यांत 19 एप्रिल रोजी मतदान झाले असून 26 एप्रिल, 7, 13, 20 आणि 25 मे रोजी तसेच 1 जून रोजी मतदान होणार आहे.

मुंबईसह महामुंबई प्रदेशात मोठ्या संख्येने उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालचे नागरिक राहतात. त्यांना आपल्या गावी उन्हाळी सुट्टीसाठी आणि मतदानासाठी जाण्याची ओढ लागल्याने सध्या बिहार, उत्तर प्रदेशला जाणार्‍या सर्व नियमित गाड्या रिग्रेट झाल्या आहेत. रोज किमान 40 गाड्या रेल्वेतर्फे चालविण्यात येत आहेत. त्या आणि रेल्वे प्रशासनाने सोडलेल्या स्पेशल गाड्याही कमी पडत आहेत. एका मेल-एक्सप्रेसची प्रवासी क्षमता तीन हजार आहे. परंतु सध्या एका गाडीतून किमान 5 हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. आतापर्यंत नियमित गाड्यांनी 25 लाख, तर स्पेशल गाड्यांनी 15 लाख प्रवाशांनी प्रवास केला

36 तासांचा प्रवास

उत्तरप्रदेश, बिहारला जाणारे प्रवासी स्वतःसोबत लग्नाच्या बस्त्यापासून भांडी आणि साबणापयर्ंत सामान नेतात. काही प्रवासी तर मुंबईतून कुलर देखील घेऊन जात आहेत. उत्तर प्रदेश, बिहारला जाण्यासाठी 27 ते 36 तासांचा प्रवास करावा लागतो.

स्पेशल ट्रेन : 125
ट्रेन ऑन डिमांड : 360
बिहारला गेल्या नियमित गाड्या : 239
युपीला गेल्या नियमित गाड्या : 567
इतर रेल्वेच्या गाड्या : : 69

उत्तर प्रदेशच्या जौनपूर, बलिया, आजमगढ, गोरखपूर, वाराणसी, मऊ, भदोही, अयोध्या, सुल्तानपुर, प्रतापगढ, प्रयागराज या जिल्ह्यांसह इतर जिल्ह्यांतील नागरिक मोठ्या संख्येने मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, पनवेल परिसरात राहतात. उत्तर प्रदेशमधील वाराणसी व्यतिरिक्त इतर प्रमुख जिल्ह्यांसाठी ठराविक गाड्या आहेत. त्यामुळे प्रमुख गाड्यांवर उत्तर प्रदेश, बिहारवासीयांची मदार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news