प्रताप सरनाईक मुख्यमंत्र्यासमोर म्हणाले, राऊत साहेब तुमचे आभार - पुढारी

प्रताप सरनाईक मुख्यमंत्र्यासमोर म्हणाले, राऊत साहेब तुमचे आभार

मुबंई, पुढारी ऑनलाईन: मुख्यमंत्री म्हणून तुम्ही आम्हाला नेहमीच प्रोत्साहन देता, त्याबद्दल आभार मानतो मात्र, संजय राऊत हे नेहमी आम्हाला ऑक्सिजन देतात,त्यामुळे त्यांच खास आभार मानतो, असे वक्तव्य आमदार प्रताप सरनाईक यांनी केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ठाण्यात सरनाईक यांनी उभारलेल्या ऑक्सिजन प्लांटचं लोकार्पण करण्यात आले.

प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दोन ऑक्सिजन प्रकल्पांची उभारणी करण्याचे निश्चित करण्यात आले.

त्यापैकी पहिल्या मीरा भाईंदरच्या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले होते. आज ठाणे शहरातील दुसऱ्या प्लांटचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांसमोर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांचे आभार मानले.

ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री साहेब तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल तुमचे आभार मानतो. आजपासून या प्लांटचे लोकार्पण झाल्यामुळे कार्यरत होत आहे.

या ठिकाणी आलेल्या सर्वांचे मी आभार मानतो. खासकरून संजय राऊत साहेब यांचे मी आभार मानतो.

कारण सर्वांना ऑक्सिजन देतो, पण मला ऑक्सिजन देण्याचे काम संजय राऊत करतात. ते दुसऱ्यांनाही ते ऑक्सिजन देत आहेत.’

संजय राऊत म्हणाले, ‘आपल्यावर जेवढी संकट येत आहे तेवढ्या संकटाशी शिवसेना जोरदार सामना करत आहे.

त्याला कारण आपल्या मागे असलेली सामाजिक कार्याची पुण्याई हे आहे. हे पुण्य आपल्या गाठीशी आहे. तुमच्यावर कितीही संकटे आली.

आमच्यावर कितीही संकटं आली. तरी त्याचा सामना करू.’

सरनाईकांमागे आहे ईडीचा ससेमिरा

नोव्हेंबर २०२० मध्ये ईडीने बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापे टाकले होते. त्यांचा मुलगा विहंग सरनाईक यांची चौकशी ईडीकडून करण्यात आली होती. सरनाईक यांच्या भागीदारालाही अटक केली आहे.

सरनाईक यांनी विधानसभेत अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणला होता. त्यानंतर त्यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे.

हेही वाचा: 

Back to top button