चाकू हल्ल्यानंतर लेखक सलमान रश्दी व्हेंटिलेटरवर, एक डोळा गमावण्याची शक्यता | पुढारी

चाकू हल्ल्यानंतर लेखक सलमान रश्दी व्हेंटिलेटरवर, एक डोळा गमावण्याची शक्यता

न्यूयॉर्क ; वृत्तसंस्था : अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये शुक्रवारी एका साहित्यिक कार्यक्रमात लेखक सलमान रश्दी यांच्या मानेवर आणि पोटावर वार करण्यात आले. 75 वर्षीय लेखक व्हेंटिलेटरवर आहेत आणि त्यांचा डोळा गमावू शकतो. पोलिसांनी त्याच्या हल्लेखोराची ओळख पटवली आहे.

लेखकाच्या प्रतिनिधींनी सांगितले की सलमान रश्दीच्या हाताच्या नसा तुटल्या होत्या आणि त्याच्या यकृताला इजा झाली होती आणि एक डोळा गमावू शकतो. “बातमी चांगली नाही,” असे त्यांचे प्रतिनिधी अँड्र्यू वायली, यांनी ईमेलमध्ये म्हटले आहे. “सलमानचा एक डोळा गमवावा लागण्याची शक्यता आहे; त्याच्या हातातील नसा तोडल्या गेल्या आहेत; आणि त्याच्या यकृतावर वार आणि नुकसान झाले आहे.”
न्यू यॉर्क राज्य पोलिसांनी त्यांच्या हल्लेखोराची ओळख पटवली असून हादी मातर (24) न्यू जर्सी, असे या हल्लेखोराचे नाव आहे. “हल्ल्यामागील हेतू अस्पष्ट आहे,” असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

चौताकुआ इन्स्टिट्यूशन या संस्थेतर्फे रश्दी यांना व्याख्यान देण्यासाठी बोलावण्यात आले होते. त्यांची ओळख करून दिली जात असताना हादी मातर याने स्टेजवर धाव घेत एकाएकी रश्दी यांच्यावर वारंवार चाकूने वार केले. हल्ल्यात मुलाखतकाराच्या डोक्यालाही दुखापत झाली आहे.

या घटनेनंतर व्यासपीठावर आणि प्रेक्षकांत प्रचंड गोंधळ उडाला. हल्ल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी रश्दी यांच्याभोवती कडे केले. रश्दी यांच्या शर्टावर रक्ताचे डाग आढळले आहेत. तसेच तेथील भिंतीवरही रक्ताचे काही थेंब उडाल्याचे दिसले आहे. या घटनेचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे. पोलिसांनी हल्लेखोराला झडप टाकून ताब्यात घेतले असून त्याची रवानगी कोठडीत करण्यात आली आहे. सलमान रश्दी यांच्यावर हल्ला झाल्यानंतर तातडीने सारे सभागृह मोकळे करण्यात आले.

सॅटनिक व्हर्सेस या वादग्रस्त पुस्तकाच्या लेखनामुळे रश्दी यांच्याविरोधात इराणने 1980 मध्ये मृत्युदंडाचा फतवा जारी केला होता. तसेच त्यांची हत्या करणार्‍याला 30 लाख डॉलर्सचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

Back to top button