सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा अनेक कारणांनी वादग्रस्त ठरलेले ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले हे सोमवारी (दि. 8) अमेरिकेला जाणार आहेत. डिसेंबरपर्यंत तिथे वास्तव्य करून ते पीएस अँड एज्युकेशन या विषयाची पहिली सेमीस्टर पूर्ण करणार आहेत. त्यांचा संपूर्ण खर्च अमेरिका सरकारचे कल्चरल अँड एज्युकेशन मंत्रालय करणार आहे. तीन डिसेंबर 2020 मध्ये युनेस्को व लंडनस्थित वार्की फाऊंडेशनच्या वतीने प्रतिष्ठेचा ग्लोबल टीचर अॅवॉर्ड डिसले यांना दिला होता.
हा पुरस्कार मिळविणारे ते पहिले भारतीय शिक्षक होत. या पुरस्काराची रक्कम सात कोटींहून अधिक होती. या पुरस्काराबरोबरच डिसले यांचा जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून सन्मानही झाला होता. या पुरस्कारासाठी सुमारे 12 हजार जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी पहिल्या 10 जणांच्या यादीत डिसले यांनी स्थान मिळविले होते. यापूर्वी मायक्रोसॉफ्ट फाउंडेशनचा शिक्षण क्षेत्रातील पुरस्कारही डिसले यांना मिळाला होता. क्युआर कोडचा वापर करुन शालेय पुस्तकातील धडा, कविता वाचता येतो, हे डिसले यांनी आपल्या संशोधनातून दाखवून दिले होते. परितेवाडी (ता. माढा) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ते कार्यरत होते.
जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग व डिसले यांच्यामध्ये झालेल्या दुराव्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. त्यांची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीही नेमली होती. या सगळ्या प्रकरणाला राजकीय वळण लागल्यानंतर त्यांनी आपला शिक्षक या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी त्यांचा राजीनामा नामंजूर केला आहे. मात्र, त्यांची रजा यापूर्वीच मंजूर आहे. त्यामुळे ते सोमवारी अमेरिका दौर्यावर निघाले आहेत.