सर्वाधिक छापे महाराष्ट्रात टाकून ईडीचा गैरवापर सिद्ध : नीलम गोर्‍हे | पुढारी

सर्वाधिक छापे महाराष्ट्रात टाकून ईडीचा गैरवापर सिद्ध : नीलम गोर्‍हे

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा इतर राज्यांपेक्षा ईडीच्या सर्वाधिक कारवाया महाराष्ट्रातच सुरू आहेत. त्यातही विरोधी पक्षाचे नेतेच रडारवर आहेत. जनतेला यामागचा नेमका अर्थ उमगला असून, ईडीचा गैरवापर होत असल्याची टीका विधानपरिषदेच्या उपाध्यक्षा नीलम गोर्‍हे यांनी केली. गोर्‍हे रविवारी सोलापूर दौर्‍यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे  प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीशी संवाद साधला. तत्पूर्वी त्यांनी सकाळी तुळजापूरला जाऊन श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.

राज्यातील सरकार अचानक कोसळल्यामुळे जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने असलेल्या अनेक योजना अर्धवट राहिल्या आहेत. यामध्ये पंढरपूर मंदिर समितीसाठी जवळपास 73 कोटी रुपयांचा आराखडा नियोजन मंडळाकडे प्रलंबित राहिला. मंदीरात होत असलेली गळती काढण्याचे काम सुरु असल्याची माहिती गोर्‍हे यांनी यावेळी दिली. राज्य सरकारविषयी त्या म्हणाल्या, सध्या राज्याचा कारभार दोनच मंत्र्यावर सुरु आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यासाठी त्यांना नेमक्या काय अडचणी आहेत? हेच कळत नाही. काही गोष्टी न्यायालयात आहेत. त्यामुळे यांना कदाचित भिती वाटत असावी म्हणून ते मंत्री मंडळाचा विस्तार करित नसतील, असा टोलाही गोर्‍हे यांनी लगावला.

मंत्रिमंडळ विस्तारास का उशीर लागत आहे, त्याची नेमकी कारणे काय आहेत. हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यानीच स्पष्ट करावीत, असे आव्हानही गोर्‍हे यांनी केले. शिवसेना खासदार संंजय राऊत यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याविषयी गोर्‍हे यांनी ईडीच्या कारवाया या जाणिव पूर्वक होत असल्याची टिका केली.

Back to top button