श्रावणानिमित्त मल्लिकार्जुन मंदिरात प्रवचन | पुढारी

श्रावणानिमित्त मल्लिकार्जुन मंदिरात प्रवचन

अक्कलकोट : पुढारी वृत्तसेवा श्रावण मासानिमित्त अक्कलकोट येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थान ट्रस्टच्यावतीने मल्लिकार्जुन मंदिरात कलबुर्गी येथील श्री शरणबसवेश्वर यांच्यावर आधारित महापुराण चरित्र निरुपण आयोजित करण्यात आल्याची माहिती मल्लिकार्जुन देवस्थान ट्रस्टच्यावतीने देण्यात आली. या महापुराणसेवेत शुक्रवार, 29 रोजी श्रावण मासारंभ ते रविवार 28 ऑगस्टपर्यंत अक्कलकोटच्या वीरक्त मठाचे मठाधिपती प.पू.श्री.म.नि.प्र. बसवलिंग महास्वामी यांच्या दिव्य सानिध्यात कर्नाटकच्या विजयपूर जिल्ह्यातील उमराणीचे वेदमूर्ती मुरुघेंद्र शास्त्री यांच्या अमृतवाणीतून श्री शरणबसवेश्वर महापुराण चरित्र श्रवणाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे.

श्रावणमासात मल्लिकार्जुन मंदिरात नित्यपणे पहाटे 5 वाजता रुद्राभिषेक, सकाळी 6 वाजता मूर्तीपूजापाठ, सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत श्री मल्लिकार्जुन देवाचे दर्शन, सायंकाळी 4 ते 5 या वेळेत भजन सेवेत मल्लिकार्जुन व अक्कनबळग भजनी मंडळ यांची भजनसेवा होईल. सायंकाळी 5 ते 7 या वेळेत वेदमूर्ती मुरुघेंद्र शास्त्री यांच्या अमृतवाणीतून कलबुर्गी शरणबसवेश्वर महापुराण चरित्र निरुपण, सायंकाळी 7 वाजता आरती आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या महापुराण सेवेदरम्यान रविवार, 21 ऑगस्ट रोजी प.पू.ष.ब्र.जयगुरुशांत लिंगाराध्य शिवाचार्य महास्वामी (हिरेजेवरगी व अक्कलकोट) यांच्या हस्ते महापुराण सेवेप्रारंभी अय्याचार व लिंगदीक्षा विधी होणार आहे. संगीत सेवेत सिंदगी येथील यशवंत बडीगेर, तबल्यावर राजशेखर कट्टीसांगवी यांची साथसंगत लाभणार आहे. सर्व शिवभक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मल्लिकार्जुन देवस्थान ट्रस्टच्यावतीने केले आहे.

Back to top button