साेलापूर : विजेच्या धक्क्यानेे सहा म्हशी, गायीचा मृत्यू | पुढारी

साेलापूर : विजेच्या धक्क्यानेे सहा म्हशी, गायीचा मृत्यू

बार्शी : पुढारी वृत्तसेवा तुटून पडलेल्या विजेच्या तारेचा धक्का लागून चार म्हशी, दोन रेड्या व एका गायीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास बार्शी-कुर्डूवाडी बाह्यवळण रस्त्यावरील लक्ष्याचीवाडी हद्दीत घडली. या घटनेत सहा म्हशी व एका गायीचा मृत्यू झाल्यामुळे शेतकर्‍यांचे एकूण दहा लाख रुपयांचे नुकसान झाले असून आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. बार्शी येथील सागर आदमिले (रा. उपळाई रोड) या शेतकर्‍याने दुग्धोत्पादनासाठी एकुण पंधरा म्हशी व गायी संभाळल्या होत्या. जनावरे चारण्यासाठी त्यांनी बार्शी बाह्यवळण रस्त्यापासून काही अंतरावर एकाचे आठ एकर क्षेत्र भाडेतत्त्वावर घेतले होते.

सोमवारी त्यांनी जनावरे शेतात चरण्यासाठी सोडली. दरम्यान, पोलवरील मुख्य विद्युत वाहिनीवरून विहीरीवर गेलेल्या जीर्ण विद्युत तारा खाली जमिनीवर तुटून पडल्या होत्या.तुटून पडलेल्या तारांची कल्पना शेतकर्‍याला नसल्याने जनावरे चरत-चरत त्या गवतात पडलेल्या विद्युत प्रवाह सुरू असलेल्या तारेच्या जवळ गेली. एका पाठोपाठ चरत असलेली तब्बल सात मुके निष्पाप जिव तडफडुन मृत्युमुखी पडले.

घटनास्थळाजवळच काही दिवसांपूर्वी एका वन्य प्राण्याचाही या तारेच्या विद्युत प्रवाहाचा धक्का लागुन मृत्यू झाल्याचे चित्र निदर्शनास येत होते. मृत झालेल्या जनावरामध्ये गर्भवती चार म्हशी, एक गर्भवती गाय व दोन रेड्याचा समावेश आहे. घरी तयार केलेल्या पंढरपुरी जातीच्या प्रत्येकी दोन लाखांच्या दोन म्हशी,प्रत्येकी दीड लाखाच्या अन्य दोन म्हशी, देवणी गाय व दोन रेड्या प्रत्येकी एक लाख रुपयांच्या अशी एकुण दहा लाखांचे पशुधन मृत्युमुखी पडले. पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी शवविछेदन केले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास बार्शी पोलिस करीत आहेत.

Back to top button