सोलापुरात तब्बल 22 स्कूलबस जप्त | पुढारी

सोलापुरात तब्बल 22 स्कूलबस जप्त

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सोलापूर व पंढरपूर याठिकाणी तीन पथकं नेमून सोमवारी स्कूल बस तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेवेळी 173 स्कूल बसची तपासणी करून त्यातील 22 स्कूल बस जप्त करून त्यांच्यावर 2 लाख 75 हजार 500 रुपये दंडाची कारवाई करण्यात आली. सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत 525 स्कूल बस नोंदणीकृत आहेत. जून महिन्यात शाळा सुरू होण्यापूर्वी स्कूल बस चालकांनी त्यांच्या स्कूल बस तपासून घ्यावेत, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले होते. त्यावेळी जवळपास 150 स्कूल बसचालकांनी त्यांच्या स्कूल बस तपासून घेतलेल्या होत्या. त्यामुळे अद्यापही अनेक स्कूल बसेसची तपासणी झालेली नसल्यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सोमवारपासून स्कूल बस तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.

सोमवारी दिवसभर सोलापूर शहरातील अनेक शाळांसमोर आरटीओ अधिकार्‍यांनी ठाण मांडून स्कूल बसेची तपासणी केली. स्कूल बससाठी शासनाने जी नियमावली दिली आहे, त्याप्रमाणे स्कूल बस आहे का, त्यातील सोयीसुविधा याची तपासणी केल्यानंतर मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यावेळी योग्य नसलेल्या स्कूल बसेस अधिकार्‍यांनी जप्त करून त्या कार्यालयात आणून लावल्या. दिवसभरामध्ये 22 स्कूल बस जप्त करण्यात येऊन त्यांच्याकडून 2 लाख 75 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई पुढील काही दिवस सुरू राहणार असल्याचे सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिरणकर यांनी दिली. या कारवाईमध्ये मोटार वाहन निरीक्षक सुखदेव पाटील, महेश रायभान, राजेश आहुजा, शिरीष तांदळे, सहायक मोटार वाहन निरीक्षक अक्षय जाधव, मयूर जाधव, वैभव सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला.

Back to top button