सोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आजी-माजी आमदार फडणवीसांच्या भेटीला | पुढारी

सोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आजी-माजी आमदार फडणवीसांच्या भेटीला

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौर्‍यादरम्यान अनेक आमदार-खासदारांच्या भेटीसत्रामुळे सोमवारी नवीन महाराष्ट्र सदन गजबजले होते. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खिंडार पडणार असल्याची चर्चा राजधानीत सुरू झाली. राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी फडणवीस यांची भेट घेतली. गेल्या अनेक दिवसांपासून राजन पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

सोमवारच्या या भेटीनंतर राजन पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्‍चित असल्याचे बोलले जात आहे. बबन शिंदे हे माढा मतदारसंघाचे आमदार आहेत. पाटील हे शरद पवारांचे जवळचे मानले जातात. भेटीनंतर कुठलीही प्रतिक्रिया देण्यास बबन शिंदे यांनी नकार दिला. भेटीदरम्यान उपस्थित भाजप खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी, योग्य वेळ आल्यावर प्रतिक्रिया देऊ, असे सूचकपणे सांगितले.

दोघांचाही इन्कार

भाजप प्रवेशाबाबत राजन पाटील यांनी या वृत्ताचा इन्कार केला आहे. आमदार बबनदादा शिंदे आणि मी साखर कारखानदार असून आमच्या काही व्यावसायिक अडचणी होत्या. त्यासाठी दिल्लीत महाराष्ट्र भवनात आलो होतो. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याचे त्यांनी सांगितले. मोहोळ तालुक्यात राजन पाटील व राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष उमेश पाटील यांच्यात टोकाचा संघर्ष सुरू आहे. यातूनच राजन पाटील यांचा त्यांच्या गटावर अन्याय होत असल्याच्या तक्रारी होत आहेत. पक्षश्रेष्ठींकडून याची दखल घेत नसल्याबद्दलही राजन पाटील यांच्यासह पुत्र बाळराजे पाटील अजिंक्यराणा पाटील यांच्या तक्रारी आहेत. यातूनच गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती. त्याला खुद्द जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे यांनी दुजोराही दिला होता. यातूनच दोन दिवसापूर्वीच साठे यांना सोबत घेवून राजन पाटील यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली होती. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत बैठक घेऊन तोडगा काढू, असे सांगण्यात आल्याचे राजन पाटील यांनी स्पष्ट केले होते.

दरम्यान, पवारांच्या भेटीनंतरही राजन पाटील यांनी थेट दिल्ली गाठली आहे. जोडीला बबनदादा शिंदे हे ही दिल्ली दौर्‍यात सोबत होते. दोघेही दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद फडणवीस यांच्यासह आणखी काही भाजप नेत्यांची त्यांनी भेट घेतली. यावेळी माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हेही उपस्थित होते. त्यामुळे शिंदे आणि राजन पाटील हे भाजपात जाणार असल्याची जोरदार चर्चा सेामवारी दिवसभर सोशल मिडियावर रंगली होती. याची तत्काळ राजन पाटील यांनी दखल घेत भाजप प्रवेशाचा इन्कार केला. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाकडूनही खुलासा करण्यात आला असून, दोन्ही राष्ट्रवादीशी आणि शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ असल्याचे सांगण्यात आले आहे. तरीही जिल्ह्यात भाजपकडून ‘ऑपरेशन लोटस’ राबविल्याची चर्चा रंगली आहे. त्यासाठीच दोघेही दिल्लीला गेल्याच्या चर्चांना ऊत आला आहे.

Back to top button