राज्यातील सत्तांतरानंतर ‘तुझ्या गळा.. माझ्या गळा…’ | पुढारी

राज्यातील सत्तांतरानंतर ‘तुझ्या गळा.. माझ्या गळा...’

सोलापूर : संतोष आचलारे राजकारण करताना अमुक नेता तमक्या पक्षाचा, तमुक नेता तमक्या पक्षाचा, असे कार्यकर्ते आपसांत बोलत असतात. सत्तेत असलेल्या पक्षातील लोकप्रतिनिधींचीच कामे होतात, असाही एक मतप्रवाह असतो. मात्र करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे, सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यात असलेल्या राजकारणापलीकडच्या मैत्रीची चर्चा आता होत आहे. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर या दोघांत होत असलेला ‘तुझ्या गळा.. माझ्या गळा…’ भेटीने विकासकामांसाठी नवा आधार दिला आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आ. विजयकुमार देशमुख हे राज्यमंत्री होते. ते सोलापूरचे पालकमंत्री होते. याकाळात संजयमामा शिंदे हे अपक्ष असतानाही त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यात तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही संजयमामा शिंदे यांची मैत्री आहे. या मैत्रीआधारेच संजयमामा शिंदे यांना धक्कादायकरीत्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होण्याचा मान मिळाला. याकाळात आ. प्रशांत परिचारक, आ. विजयकुमार देशमुख, आ. समाधान आवताडे, आ. राजेंद्र राऊत, जि.प. माजी अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे, जि.प.चे माजी सदस्य सुरेश हसापुरे यांची राजकारणापलीकडील मैत्रीपर्व चांगलेच चर्चेचे ठरले होते.

विधानसभा निवडणुकीदरम्यान संजयमामा शिंदे यांनी अपक्ष म्हणून करमाळा विधानसभा निवडणूक लढविली. यात त्यांनी आमदारकीही खेचून आणली. विकासकामांसाठी त्यांनी राज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडीसोबत राहण्याचा निर्णय मागील अडीच वर्षांच्या काळात घेतला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून आ. संजयमामा शिंदे यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघात विकासकामांसाठी सुमारे दोन ते अडीच हजार कोटींचा निधी खेचला असल्याचे सांगण्यात येत आहे. आता शिंदे सरकारमध्ये आ. विजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून आ. संजयमामा शिंदे यांचीही शिंदेशाही चालेल, असा अंदाज राजकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे. राजकारणापलीकडील ही मैत्री विकासकामांसाठी योग्य असली तरी पक्षनिष्ठेचे काय, असा तिखट प्रश्नही काही कार्यकर्त्यांतून यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.

राजकारणापलीकडील मैत्री

राज्यात एकनाथ शिंदे सरकार आल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात भाजपच्या आमदारांचे वर्चस्व वाढले आहे. कदाचित आ. विजयकुमार देशमुख यांना पुन्हा पालकमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यांना जरी पालकमंत्रिपद मिळाले नाही, तर शिंदे सरकारमध्ये आ. विजयकुमार देशमुख यांचे राजकीय वजन असणार आहे. या पार्श्वभूमीवर आ. संजयमामा शिंदे यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत घेतलेली आ. विजयकुमार देशमुख यांची भेट भविष्यातील मैत्रीयुक्त राजकारणाचे संकेत देत आहेत. यावेळी प्रशांत परिचारक, माजी जि.प. सदस्य आनंद तानवडे यांच्या असलेल्या उपस्थितीने राजकारणापलीकडील मैत्रीचे रूप दाखवून दिले. या लोकप्रतिनिधींच्या मैत्रीचा सोलापूर शहरासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील विकासकामांना फायदा व्हावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

Back to top button